सिंधुदुर्ग परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा

शिवसेना नेते संदेश पारकर यांची मागणी : आमदार वैभव नाईक यांच्यासोबत परिवहनमंत्री अनिल परब यांची घेतली भेट

*💫कणकवली दि.२६-:* सिंधुदुर्ग परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्यांच्या संदर्भात शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. कर्मचाऱ्यांची ड्युटी नेमताना एसटी महामंडळाने निर्गमित केलेले नियम डावलुन कर्मचारी कमी आहेत हे कारण पुढे करुन काही अधिकारी त्यांच्याच मर्जितल्या काही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. यामुळे ईमानदारीने काम करणारे कर्मचारी विनाकारण भरडले जात असुन संघटनात्मक वाद निर्माण केला जात आहे. यामुळे निष्पाप कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. जिल्ह्यात वस्तीच्या ठिकाणी वाहक चालकांना राहण्याच्या सोयीसुविधा अद्यापही उपलब्ध झालेल्या नाहीत. काही अधिकाऱ्यांकडून लाईन चेकिंगच्या नावाखाली नाहक गुन्हे नोंद करून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. महामंडळाची जुनीच नियमावली अजूनही सुरु असुन त्यात मूलभूत सुधारणा होणे गरजेचे आहे. परंतु विभागीय पातळीवरून मनमानी पद्धतीने कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता स्टेअरिंग ड्युटीचा विचार न करता एखाद्या ड्युटीला ट्रिप जोडणे किंवा पूर्वीपासून चालत आलेली धाव वेळ पुनर्तपासणी न करता कागदोपत्री पुर्तता करून जैसे थे ठेवण्यात येतेय. या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता याची चौकशी होणे गरजेचे आहे असह्य आग्रही मागण्या संदेश पारकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड, वैभववाडी, दोडामार्ग या तालुक्यांमधे अद्यापही मुंबई व पुणे येथे जाण्यासाठी शिवशाही बससेवा सुरु झालेली नाही. तरी आपण प्राधान्याने या तालुक्यांत शिवशाही सेवा सुरु करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच चालक वाहकांची मुंबई येथे नेमणुक करण्यात आली असल्याने सिंधुदुर्ग मधील चालक वाहकांची कमतरता भासत आहे. या सर्व चालक वाहकांना पुन्हा सिंधुदुर्गमधे रुजू करावे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना अन्य विभागातुन नियमित डिझेल पुरवठा मिळत नसल्याने समस्या निर्माण होते. त्यासाठी अन्य आगारांना लांब पल्ल्याच्या गाड्यांना नियमित डिझेल पुरवठा करण्याचे आदेश देण्यात यावेत. कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने गाड्यांची देखभाल दुरुस्ती करायला विलंब होतो. यासाठी कार्यशाळा कर्मचारी संख्या वाढवून मिळावी. जिल्ह्यातील सर्व आगारांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत. जिल्ह्यातील बऱ्याच एसटी बसेस जुन्या झाल्या असल्याने जिल्ह्यासाठी नवीन गाड्या द्याव्यात अश्या अनेक मागण्या देखील संदेश पारकर यांनी मंत्री महोदयांकडे केल्या. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी संदेशभाई मी तुम्हा सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहीन, अशी ग्वाही परिवहनमंत्री श्री.अनिल परब यांनी शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांना दिली. यावेळी युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, शिवसेना हरकुळ विभागप्रमुख बंड्या रासम, महेंद्र डिचवलकर, प्रतिक रासम आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page