Headlines

१४ जूनला साजरा होणार रक्तदाता सन्मान दिन

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन

बांदा/प्रतिनिधी
“जागतिक रक्तदाता दिन’ तसेच ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’चा तृतीय वर्धापनदिन गुरुवार दिनांक १४ जूनला असून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्यावतीने हा दिवस ‘रक्तदाता सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबिराच्या आयोजनासह ऑनकॉल रक्तदाते, वर्षभरात रक्तदान शिबिरे घेतलेल्या सर्व मित्र संस्था तसेच महिला रक्तदात्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही रक्तदान, देहदान, अवयवदान क्षेत्रात कार्यरत असणारी शासनमान्य नोंदणीकृत संस्था आहे. गंभीर रुग्णांना तात्काळ रक्ताची गरज असताना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या
रक्तदात्यांनी सातत्याने तात्काळ अगदी दिवस-रात्रीचा विचार न करता तसेच आपल्या कामात व्यस्त असताना आणि क्षणाचाही विलंब न करता रक्तपेढीमध्ये धाव घेऊन रक्तदानाने रुग्णांचा जीव वाचविला आहे. या सर्व रक्तदात्यांप्रती कृतज्ञतेचाच एक भाग म्हणून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सन्मान सोहळा सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी आर. पी. डी. हायस्कुलच्या सभागृहात होणार आहे. तत्पूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीत सकाळी ८ ते दुपारी ११.३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ७४३ गावांमध्ये ही संस्था रक्तदान चळवळीबाबत जनजागृती करत आहे. वेळीच रक्तपुरवठा करून रुग्णांचा जीव वाचविणे हे संस्थेचे आद्यकर्तव्य असून सामाजिक जबाबदारी म्हणून शासनाच्या धोरणाला अनुसरून रक्तदान चळवळीच्या विविध कार्यात ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेने जिल्ह्यात सातत्याने अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हजारो रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले आहे. रक्ताबरोबरच प्लेटलेट्स, प्लाझ्मा दान यामध्येही संस्थेचे सदस्य अग्रेसर आहेत. या संस्थेत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, मार्गदर्शक, सहाय्यक, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुनील राऊळ, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, उपाध्यक्ष महेश रेमूळकर, साक्षी कारिवडेकर, कार्याध्यक्ष दीपक तारी, नारायण नाईक, सहखजिनदार योगेश सावंत यांनी केले.

You cannot copy content of this page