मडुरा पंचक्रोशीत पावसाळ्यापूर्वीच वीज गुल

प्रत्येक मंगळवारी शटडाऊन तरीही पुरवठा खंडित : ग्राहकांचे मात्र हाल

⚡बांदा ता.१०-: शनिवारी पहाटे मान्सून पूर्व सरी बरसण्यास सुरुवात झाली अन सालाबादप्रमाणे वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रथेस सुरुवात झाली. प्रत्येक मंगळवारी दुरुस्तीच्या नावाखाली मडुरा पंचक्रोशीतील वीज पुरवठा खंडित केला जातो. वीज बिल अव्वाच्या सव्वा येत असून वीज पुरवठा मात्र बेभरवशाचा झाला. पहाटे खंडित केलेला वीज पुरवठा सकाळी 11 वाजताच्या सुमारास सुरळीत करण्यात आला. त्यामुळे वीज वितरणच्या मान्सून पूर्व कामांची पोलखोल पावसाने केली आहे. वीज पुरवठा अखंडित न ठेवल्यास बांदा वीज वितरण कार्यालयावर मडुरा पंचक्रोशीतील ग्राहक धडक देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
मडुरा पंचक्रोशीत शनिवारी पहाटेच्या सुमारास मान्सून पूर्व सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दरम्यान लगेचच वीज पुरवठा खंडित झाला. साधा मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला तरी वीज गुल होत असल्याने अधिकारी काय कामे करतात असा सवाल करत ग्राहकांतून महावितरणप्रती प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.
सद्यस्थितीत अतिप्रमाणात उकाडा होत असल्याने जनता घामाघूम होत असून पंख्याचा किंवा कूलरचा आसरा घेण्याच्या स्थितीत असताना, शक्यतो ग्रामीण भागात अघोषित वीज खंडित करण्याचे प्रकार हे कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. अशा या प्रकारामुळे जनता त्रस्त झाली असून, याच वेळेस हे प्रकार का होतात, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
पावसाळ्यापूर्वी मान्सूनपूर्व कामे ज्यात तारेवरील झाडे तोडणे, फांद्या छाटणे, जीर्ण तारा बदलणे किंवा इतर तांत्रिक बाबींतून कामे आटोपली असली तरी वादळी वारा नसतानाही वीजपुरवठा खंडित होताेच कसा, अन वर्षभर अधिकारी व कर्मचारी काय करतात असाही प्रश्न ग्राहकांतून विचारला जात आहे. गेल्या महिनाभरापासून तर ग्रामीण भागात प्रत्येक मंगळवारी वीज गायब होत आहे. तर अन्य दिवशी कधीही संध्याकाळी व रात्रीही असाच प्रकार सुरू असल्यामुळे वीज ग्राहक सध्या त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास बांदा वीज कार्यालयावर धडक देणार असल्याचे मडुरा पंचक्रोशीतील ग्राहकांनी सांगितले.

You cannot copy content of this page