भाजपने घेतली गटशिक्षणाधिकारी माने यांची भेट घेत केली मागणी
मालवण दि प्रतिनिधी :
राज्यातील शाळा १५ जून पासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मालवणचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांची भेट घेऊन शिक्षकांच्या रिक्त जागा व उपलब्ध शिक्षक यांचा आढावा घेतल्यानंतर शाळांमध्ये शिक्षकांचे नियोजन करताना शिक्षण विभागाने गावातील ग्रामस्थ, पालक यांच्या मागण्यांचा विचार प्राधान्याने करून कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे
मालवण पंचायत समिती येथे मालवण तालुक्यातील शाळांचा आढावा घेत उपलब्ध व रिक्त शिक्षक पदांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी उपसभापती राजू परुळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी रिक्त पदे व अन्य प्रश्न सोडवण्याबाबत माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
दरम्यान, आंतरजिल्हा व नियमित बदली प्रक्रियेतून शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर काही शिक्षक बदली प्रक्रियेतून मालवणात नियुक्त झाले आहेत. नवीन भरती प्रक्रिये नंतर लवकरच अधिक संख्येने शिक्षक जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेत. सध्यस्थीतीत २५ शाळा शून्य शिक्षकी दिसत आहेत. मात्र १५ जून पासून सर्व शाळेत सर्वसाधारणपणे पटसंख्येचा विचार करून बदली होऊन आलेल्या व उपलब्ध शिक्षकां मधून शिक्षक नियुक्त झाले पाहिजेत. याबाबत नियोजन शिक्षण विभागाने करावे. गावातील ग्रामस्थ, पालक यांच्या मागण्यांचा विचार प्राधान्याने व्हावा. असे गटशिक्षणाधिकारी माने यांना भाजप पदाधिकारी यांनी सांगितले.
फोटो :
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मालवण भाजपच्या वतीने उपलब्ध शिक्षक व रिक्त जागांबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात आली.
