कुडाळ शहरात पाणीटंचाई नाही !

कुडाळचे प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांची माहिती

⚡कुडाळ ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी शहरांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. मात्र, शहरात पाणीटंचाई नाही ही दिलासा बाब आहे असे प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी सांगितले. मागील वर्षी भंगसाळ नदीवर बंधारा घातल्याने पाण्याच्या प्रश्न नसल्याची माहिती
कुडाळचे प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी आज दिली. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सई काळप, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका अक्षता खटावकर उपस्थित होते.

कुडाळ शहरात ६३ अनधिकृत बांधकामे
कुडाळ शहरात ६३ अनधिकृत बांधकामे असून लवकरच यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती शिरसाट यांनी दिली.
यावेळी प्र. नगराध्यक्ष मंदार शिरसाट म्हणाले की, कुडाळ शहरात सद्यस्थितीत ६३ अनधिकृत बांधकामे असून यामध्ये आताची १३ आणि मागील ५० असा समावेश आहे. या सर्व अनधिकृत बांधकामांना प्राथमिक स्वरूपात नोटीस पाठविण्यात आली आहे. आता कुडाळ नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी प्राप्त झाले असून त्यामुळे
या सर्व अनधिकृत बांधकामांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.
तसेच कुडाळ शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यासाठी २३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे कुडाळ शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.
कचराप्रश्र्नी कुडाळ नगरपंचायतकडून भगीरथ प्रतिष्ठान झाराप येथे भेट देवून बायोगॅस प्रकल्पाची पाहणी केली. त्याच धर्तीवर कुडाळ एमआयडीसीमध्ये २ टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारला जाईल, असे ते म्हणाले.
तसेच कुडाळ शहरात ९० टक्के नालेसफाई झाली असून उर्वरित नालेसफाई पुढील दोन दिवसात पूर्ण करण्यात येईल अशी माहिती माजी नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी दिली. तसेच कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशमन बंबाने जिल्ह्यात तसेच कुडाळ शहरात उल्लेखनीय कार्य केले असून आजपर्यंत १९ ठिकाणी आगी विझवण्यात सहकार्य केले.

You cannot copy content of this page