मालवण दि प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त मालवणच्या नगर वाचन मंदिराने आयोजित केलेल्या शिवकथा व शिवगीतांच्या कार्यक्रमास शिवप्रेमींसह मालवणवासीयांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत संस्थेचे कार्यवाह नागेश कदम यानी केले. कार्यक्रमाची सुरूवात दर्श सामंत याच्या शिवकथेने झाल्यानंतर जगदिश तोडणकर यांनी एकच राजा इथे जन्मला’ हे गीत सादर करून कार्यक्रमात बहार आणली. त्यानंतर आदर्श संगीत विद्यालय मालवणच्या मंगेश कदम, गायत्री आरोलकर, गौरवी पराडकर व संजय शिंदे यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्यगीत’ सादर करून कार्यक्रमात मजा आणली तर प्रथमेश सामंत याने छ. शिवाजी महाराजांच्या कांदळगाव मालवण या ठिकाणी लावलेल्या वटवृक्षाच्या प्रसंगाबाबतची ऐतिहासिक माहिती दिली. दिपक मोयें यांनी दोन शिवगीते तर सुधीर गोसावी यांनी प्रा. नितिन बानुगडे पाटील यांच्या छ. शिवाजी महाराजांवरील एका भाषणातील एक भाग सादर केला. त्यानंतर आदर्श संगीत विद्यालय मालवणच्या कलावंतांनी ‘शूर आम्ही सरदार’, ‘वेडात मराठे वीर दौडले आणि ‘शिवनेरीवर शिवबा जन्मला ही शिवगीते सादर करून रसिकांची दाद मिळविली.
या कार्यक्रमाला संगीतसाथ हार्मोनियम विजय बोवलेकर, तबला सुधीर गोसावी व तालरक्षक श्रीकांत मालवणकर यांनी केले. ध्वनि संयोजन बबन मयेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रम स्थळाच्या प्रवेशव्दारावर छ. शिवाजी महाराजांची सुंदर छबी असलेली सुबक रांगोळी ग्रंथालयाच्या लिपिक प्रतिभा पेडणेकर यांनी काढली होती या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार संस्थेचे ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले.
