पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागरिकांना आवडीच्या झाडांचे वाटप

युथ बिट्स फॉर क्लायमेट ग्रुपचा उपक्रम

⚡मालवण ता.०७-: जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिन यांचे औचित्य साधून मालवण मधील युथ बिट्स फॉर क्लायमेट या पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ग्रुपतर्फे आज सायंकाळी झाडे भेट देण्याचा अभिनव उपक्रम पार पडला. यावेळी शंभर पेक्षा जास्त झाडांचे वाटप नागरिकांना करण्यात आले. ग्लोबल वॉर्मिंगसह इतर पर्यावरणीय समस्या वाढत असताना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून नागरिकांनी झाड लावावे व त्याची निगा राखून ते वाढवावे, या हेतूने या झाडांचे वाटप करण्यात आले.

मालवण चिवला बीच येथील शैलजा पाटील यांच्या वासंती निवास याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या देणगीमधून उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना त्यांच्या आवडीप्रमाणे झाडांचे वाटप करण्यात आले. युथ बिट्स फॉर क्लायमेट या ग्रुपची प्रमुख मेगल डिसोजा हिने यावेळी मार्गदर्शन करताना विकास प्रक्रियेत बदलत चाललेले हवामान, पर्यावरणातील बदल व त्याचे परिणाम याबाबत माहिती दिली. तसेच प्रत्येक नागरिकांने पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन त्याच्या संवर्धनासाठी झाडे लावून सुरुवात करावी, असे सांगितले. यावेळी चारुशीला देऊलकर यांनीही पर्यावरणाचे महत्व विशद केले. तर भूषण साटम यांनी कवी भूषण यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील कविता सादर करत पर्यावरण व वृक्ष संवर्धन याबाबतचे शिवाजी महाराजांचे धोरण व विचार मांडले. मालवणी कवी रुझारिओ पिंटो यांनी आपल्या मालवणी कवितामधून धोक्यात आलेले कोकणातील पर्यावरण यावर भाष्य केले. ऍड. ओंकार केणी यांनी पर्यावरण विषयक समस्यांवर कायदेशीर लढा कसा देता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

पर्यावरण रक्षणाच्या कार्यात लहान वयापासूनच योगदान देणाऱ्या मेगल डिसोजा हिच्या कार्याबद्दल अलर्ट सिटीजन फोरम मुंबई या संस्थेतर्फे संस्थेचे सदस्य अगोस्तिन डिसोजा यांच्यामार्फत मेगल हिचा रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शैलजा पाटील यांनी केले. यावेळी स्वाती पारकर, मनीषा पारकर, नेहा कोळंबकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, राहुल जाधव, ऐश्वर्य मांजरेकर, संजय वराडकर, अक्षय रेवंडकर, संजय मळेकर, विपुल प्रभुलीकर, व्हॅलेंसिया फर्नांडिस, वैभवी सातार्डेकर, दर्शन वेंगुर्लेकर, महादेव तळवडेकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page