कुडाळ रेल्वेस्थानकाला टर्मिनलचा दर्जा द्या

कुडाळ येथील सर्वपक्षीय आंदोलनात इशारा

⚡कुडाळ ता.०५-: कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ रेल्वे स्थानकाला टर्मिनलचा दर्जा द्यावा तसेच नवीन सुरू होत असलेल्या ‘वंदे भारत’ आणि अन्य एक्सप्रेसला थांबा मिळण्यासाठी आज सकाळी सर्वपक्षीय आंदोलन कुडाळ येथे करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीयांकडून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावे निवेदन कुडाळ रेल्वेस्थानक प्रमुखांना सादर करण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, कुडाळ रेल्वेस्टेशन हे कोकण रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती असे रेल्वे स्टेशन असून हा मार्ग ८५० किलोमीटरचा आहे. या मार्गावरील रोहा ते कुडाळ हे ४२५ किलोमीटर अंतर आहे. तसेच कुडाळ ते मेंगलोर हे अंतर ४२५ किलोमीटर आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा १९९५ मध्ये संपूर्ण भारतामध्ये पहिल्या प्रथम पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला होता. परंतु, गेल्या २७ वर्षात पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हयाचा हवा तसा विकास होऊ शकला नाही. कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्या संपूर्ण भारतातून धावत आहेत. परंतु, अनेक गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा नाही.
कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ रेल्वेस्टेशन हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. कारण, पर्यटनदृष्ट्या विकसित झालेल्या मालवण, आंबोली धबधबा हिल स्टेशन, चिपी एअरपोर्ट, कुडाळ एमआयडीसीला सर्वात जवळचे कुडाळ रेल्वेस्टेशन आहे. त्यामुळे नवीन सुरू होत असलेल्या वंदे भारत आणि पुणे एक्सप्रेस, मेंगलोर एक्सप्रेसला तत्काळ थांबा देण्यात यावा. तसेच कुडाळ रेल्वेस्टेशनला असलेली भूसंपादित जागा याचा विचार करता कुडाळ रेल्वे स्टेशनवर टर्मिनल व्हावे यासाठी प्रामुख्याने विचार करण्यात यावा, असे आमदार वैभव नाईक यांनी बोलताना सांगितले.
तसेच कुडाळ रेल्वेस्टेशनबाबत या मागण्या मान्य न झाल्यास कुडाळवासियांच्या वतीने रेल्वे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा आमदार वैभव नाईक यांनी दिला.

स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी कुडाळ रेल्वे स्टेशनवर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी कुडाळमधील स्थानिक नागरिक तसेच चाकरमानी प्रवाशांनी स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.


यावेळी संजय पडते, धीरज परब, अभय शिरसाट, अतुल बंगे, काका कुडाळकर, सुनील भोगटे, संदेश पडते, श्रीराम शिरसाट, मंदार शिरसाट, आफ्रीन करोल, राजन नाईक, रुपेश पावसकर, बंड्या कोरगावकर, संदीप महाडेश्वर, गुरुनाथ गडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page