हेल्मेट वापराबाबत मालवणात परिवहन अधिकाऱ्यांतर्फे जनजागृती

⚡मालवण ता.०३-: मोटर वाहन कायद्यान्वये विनाहेल्मेट मोटरसायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद या कायद्यात आहे. याबाबत गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांतर्फे मालवणातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संबंधित कार्यालयप्रमुखांना माहिती देऊन कार्यवाही करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले.

मालवण तहसील कार्यालय येथे तहसीलदार वर्षा झालटे यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्याकडे या आदेशाच्या प्रती देण्यात आल्या. तसेच तहसील कार्यालयाच्या भींतीवर ‘हेल्मेट असेल, तरच ‘प्रवेश!’ असा फलक लावून जनजागृती करण्यात आली. या नोटिस कम फलकावर नमूद केले आहे, आपल्या कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीने प्रवेश करणाऱ्यांना प्रतिबंध करावा. आपल्या कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज तपासून अशा विनाहेल्मेट दुचाकीवरून येणाऱ्यांची यादी आपण या कार्यालयास सादर करावी. जेणेकरून मोटर वाहन कायद्यातील विहीत तरतुदींनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. यावेळी मोटर वाहन निरीक्षक विजयकुमार अल्लमवार, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमित पाटील, हळदणकर मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे कल्पक हळदणकर, भूषण मेस्त्री आदी उपस्थित होते.

राज्य परिवहन आयुक्त, मुंबई यांनी २६ मे रोजी पुणे येथे झालेल्या विभागाच्या आढावा बैठकीत राज्यातील २०२२ व २०२३ मधील अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले असता, यावर्षी घडलेल्या एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. या अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात हे फक्त दुचाकी व पादचाऱ्यांचे आहेत, असे नमूद करून, त्यामुळे सर्व कार्यालयप्रमुखांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व खासगी आस्थापनांना मोटर वाहन ‘कायदा १९८८ कलम १२९ व १९४ ड मधील हेल्मेट वापरासंबंधीच्या Warning Notices जारी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. राज्य परिवहन आयुक्त, मुंबई यांनी संबंधित आस्थापनांचे सीसीटिव्ही फुटेज पडताळून विनाहेल्मेट आस्थापनेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा जारी करून दंडात्मक कारवाई करायची आहे. राज्य परिवहन आयुक्त, मुंबई व प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल यांच्या निर्देशान्वये सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे हेल्मेट वापरासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे, असेही जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page