तहसिलदार अरुण उंडे यांनी दाखविली कर्मचाऱ्यांप्रती आत्मितयता..
बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील महसूल मंडळ अधिकारी राजेसाहेब राणे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत. सावंतवाडीचे तहसीलदार अरुण उंडे यांनी त्यांना चक्क आपल्या खुर्चीत बसवून त्यांना सन्मानित केले. कनिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या खुर्चीत बसवून सन्मान दिलेल्या तहसीलदार उंडे यांचे कर्मचारी वर्गातून कौतुक होत आहे. अनपेक्षितपणे खुर्चीत बसविल्याने श्री राणे यांना देखील गहिवरून आले.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात श्री राणे यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना तहसीलदार उंडे म्हणाले की, श्री राणे यांचे महसूल क्षेत्रातील योगदान व अनुभव हा वाखाणण्याजोगा आहे. त्यांना आपल्या ३८ वर्षांच्या सेवेत तहसीलदार पदापर्यंत मजल मारता आली नाही. मात्र त्यांचा अनुभव हा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. याच भावनेतून आपण त्यांना काही क्षणासाठी का असेना तहसीलदार पदाचा मान दिला.
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांसमोरच तहसीलदार उंडे यांनी श्री राणे यांना बोलावून आपल्या खुर्चीत बसण्याचा मान दिला. तर यावेळी स्वतः तहसीलदार हे त्यांच्या बाजूला उभे राहिलेत. अचानक झालेल्या या कार्यक्रमाने श्री राणे देखील भारावून गेलेत. त्यांनी तहसीलदार उंडे यांच्या दिलदारपणाचे कौतुक करत आभार व्यक्त केलेत.
