रोख रक्कम केली लंपास : गुरुवारी पहाटेची घटना
*💫मालवण दि.२५-:* मालवण बाजारपेठेतील नाना पारकर यांच्या पारकर किराणा मर्चंट या दुकानाच्या छप्पराची कौले काढून अज्ञात चोरट्यांने दुकानात प्रवेश करीत दुकानातील ड्रॉव्हर फोडून ७ ते ८ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची माहिती दुकानाचे मालक ज्येष्ठ व्यापारी नाना पारकर यांनी दिली आहे. बाजारपेठेत चोरी झाल्याने व्यापारी आणि नागरिकांत खळबळ उडाली आहे. ही चोरी गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहितीही नाना पारकर यांनी दिली आहे. मालवण बाजारपेठेत असणारे पारकर किराणा मर्चंट हे दुकान काल रात्री साडे दहा वाजता बंद करून नाना पारकर हे घरी गेले होते. आज सकाळी साडे सात वाजता नाना पारकर यांनी दुकान उघडले असता दुकानातील सामान, ड्रॉव्हर अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले तर दुकानाच्या छप्परची कौले काढलेली असल्याचे दिसले. त्यामुळे दुकानात चोरी झाल्याचे पारकर यांच्या लक्षात आले. अज्ञात चोराने छप्पराची कौल काढून दुकानात प्रवेश करीत दुकानात असणारे तीन ड्रॉव्हर कटावणीच्या साहाय्याने फोडले असून मुख्य पैशांच्या पेटीतील सुमारे ७ ते ८ हजार रुपये लंपास केले आहेत. याशिवाय आणखी काही वस्तू अथवा ऐवज चोरीस गेल्या आहेत का याबाबत समजू शकले नाही