⚡मालवण ता.२९-: विविध सामाजिक माध्यमांद्वारे आज लोकांचे मनोरंजन होत आहे. अशा स्थितीत आजच्या सोशल माध्यमांना ओलांडून जाणारे व सध्याच्या काळाची गती पकडणाऱ्या साहित्याची निर्मिती साहित्यिकांकडून होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी येथे केले.
महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे आयोजित विद्रोही चिंतन शिबिराचे उद्घाटन मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे झाले. उद्घाटनप्रसंगी प्रा. बांदेकर बोलत होते. यावेळी १७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले, कार्यकारिणी सेक्रेटरी यशवंत मकरंद, शिबीर संयोजक सुदीप कांबळे, आदी उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रा. बांदेकर म्हणाले, माणसाच्या जगण्याची प्रचंड गुंतागुंत आहे. ती समजून घेऊन आजच्या साहित्यिकांनी लेखन करणे गरजेचे आहे. जयंत पवार, ऐनापुरे यासारख्या साहित्यिकांचे लेखन याच पठडीतले. १९६० च्या दशकात दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, विद्रोही साहित्याचे लेखन करण्यात आले. दलित साहित्याने तर भारतीय साहित्यात एक वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. परंतु सद्यस्थितीत अशा साहित्याचे लेखन करत असताना त्याला जागतिकीकरण व आजच्या काळातील संदर्भ देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले म्हणाले, महाराष्ट्रात गौतम बुद्ध, महात्मा फुले, मार्क्स, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, लोहियावादी या विचारधारांचा मध्यबिंदू शक्य आहे. या विचारधारांमधून भारतीय लोकशाहीची पायाभरणी होणार आहे. आज विद्रोहीचा मंच प्रत्येकाला आपला वाटतो. वाद आणि संघर्षातून विचारांची प्रक्रिया घडत जाणार आहे. आज देश आणि महाराष्ट्र एका वेगळ्या स्थितीतून जात आहे. अशा पस्थितीत महाराष्ट्राच्या समाज जीवनाला दिशा ‘देणारी चळवळ गतिमान करण्यासाठी समाजाची एकजूट होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
मान्यवरांचे स्वागत सुदीप कांबळे यांनी केले. प्रास्ताविक किशोर ढमाले यांनी, तर सुत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले.
