सावंतवाडी मनसेतर्फे पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके यांना निवेदन
*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी कारागृहातील कैदी राजेश गावकर मृत्यूप्रकरणी दोषारोपपत्र वेळेत सादर न केलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी मनसेतर्फे सावंतवाडी पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव विठ्ठल गावडे, ऍड. अनिल केसरकर, आकाश परब, शुभम सावंत, गौरेश गावडे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले की, सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांच्यावर राजेश गावकर मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल आहे. परंतु आरोपीने जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग व मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. परंतु दोन्ही न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिकारी यांनी आरोपी योगेश पाटील व त्यांचे साथीदार झिलबा पांढरमिसे यांना वाचविण्यासाठी दोषारोपपत्र वेळेत सादर केले नाही. सावंतवाडी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर व दिरंगाई केली. त्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे, तसेच आरोपी हे फरारी आहेत असे सांगून त्यांच्यावर कारवाई करण्यात वेळ घालविला. या सर्व गोष्टींची तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन येऊ, असा इशाराही मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.