मालवण शहराला पुरेसा पाणी पुरवठा नाही

माजी उपनगराध्यक्ष जावकर यांची नाराजी

मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर नळपाणी योजनेच्या दोन मुख्य पंपापैकी एक पंप बंद पडला असून सध्या एकाच पंपवरून तलावातील पाणी सक्शन होऊन पाणी पुरवठा होत आहे. यामुळे एकाच पंपवर ताण येत असून शहराला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याबाबत माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी लक्ष वेधले आहे. पाणी पुरवठा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा असताना याबाबत नगरपालिका प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याबाबत जावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मालवण नगरपालिकेतर्फे नळपाणी योजनेमार्फत धामापूर तलावातील पाण्याचा पुरवठा मालवण शहराला करण्यात येतो. धामापूर येथे या योजनेतील पाण्याचा उपसा करणारे दोन पंप असून यातील एक पंप बंद पडला आहे. यामुळे सध्या एका पंपाद्वारेच पाणी उपसा सुरु असल्याने पाण्याच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. हा पंप देखील बंद पडल्यास पाणी पुरवठा पूर्णपणे बंद होऊन नागरिकांचे हाल होण्याची भीती आहे, असे महेश जावकर यांनी म्हटले आहे. तसेच या पंपचे फुटवॉल पाण्यातील गाळात रुतले असल्याने पाणी सक्शन प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे गाळ काढणे गरजेचे आहे. पाणी सक्शन पुरेसे होत नसल्याने टाकीही भरत नाही. त्यामुळे शहरात कमी पाणी पुरवठा होत आहे. शहरातील राजकोट भागात एक दिवस आड देखील पाणी येत नसल्याने तेथील नागरिकांचे हाल होत असून सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, असेही महेश जावकर म्हणाले.

शहरात अनियमित व कमी पाणीपुरवठा होत असून देखील पाण्याचे बिल मात्र आहे त्याच पटीत येत आहे. बिला मध्ये कोणतीही कमी करण्यात आलेली नाही. याबाबत मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पाणी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असताना त्याबाबतच्या समस्या सोडविण्याबाबत नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही जावकर यांनी केला आहे.

मालवण शहरातील नगरपालिका हद्दीतील ग्रामीण रुग्णालय शेजारी असलेल्या पाणीसाथ टाकीतील गाळही काढण्यात आलेला नाही. तसेच नगरपालिका हद्दीतील विहिरीतील गाळही काढण्यात आलेला नाही. शहरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने नगरपालिकेच्या अग्निशमन शमन बंबाद्वारे गरजू नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महेश जावकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page