रोणापालमध्ये तिलारी शाखा कालव्याचे पाणी बंद

शाखा अभियंता धारेवर : मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक

⚡बांदा ता.२५-: तिलारी कालव्याच्या बांदा शाखा कालव्याचे पाणी महिनाभर बंद ठेवण्यात आल्याने बहुतांश गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कालवा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून खोटी आश्वासने दिली जात असल्याने मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झालेत. रोणापाल येथे शाखा अभियंता अजित पाटील यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कालवा विभागाचे अधिकारी स्वतःसाठी की ठेकेदारांसाठी काम करत आहेत असा उद्विग्न सवाल करण्यात आला.

         मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कालवा विभागाचे अभियंता अजित पाटील गुरुवारी सायंकाळी रोणापाल येथे आले होते. यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, उदय देऊलकर, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, मडुरा माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, सागर गोठस्कर उपस्थित होते.
        दुरुस्तीचे कारण पुढे करुन गेले महिनाभर कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी दशक्रोशीतील शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांची भेट घेऊन पाणीटंचाईची गंभीरता सांगितली होती. त्यांनी रविवार २१ मे पर्यंत पाणी रोणापाल पर्यंत येईल. तसे नियोजन केल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गुरुवार २५ मे पर्यंत पाणी न आल्याने स्थानिक आक्रमक झालेत.   

      कालवा ग्रामस्थांसाठी, अधिकार्‍यांसाठी की ठेकेदारांसाठी आहे असा सवाल करण्यात आला. संबंधित ठेकेदार चालढकल करुन कामे करीत असल्याने महिनाभरात काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

You cannot copy content of this page