⚡मालवण ता.२४-: आंबेरी येथील बेकायदेशीर वाळू उत्खननप्रकरणी चौके येथील राजन शशिकांत गावडे, संजय बाळकृष्ण डिचोलकर, प्रकाश निळकंठ तावडे, लक्ष्मण चंद्रकांत तावडे यांची मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपींतर्फे अॅड. स्वरूप नारायण पई व अॅड. अंबरिश गावडे यांनी काम पाहिले.
जिल्हाधिकारी यांचा वाळू उत्खनन मनाई आदेश असताना व लिलाव प्रक्रिया बंद असताना आंबेरी येथील खाडी किनारी होड्यांमधून बेकायदेशीर वाळू उपसा करण्याच्या प्रयत्नात असल्याबाबत राजन शशिकांत गावडे, संजय बाळकृष्ण डिचोलकर, प्रकाश निळकंठ तावडे, लक्ष्मण चंद्रकांत तावडे (सर्व रा. चौके, ता मालवण) यांच्या विरुद्ध मालवण पोलीस ठाण्यामध्ये २३ ऑगस्ट २०१८ रोजी भा. दं. वि. कलम ३७९, ५११ प्रमाणे मालवण तहसीलदार यांच्यावतीने येथील मंडळ अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केली होती. आरोपींच्या वाळू उपशाकरिता वापरल्या जाणाऱ्या होड्या जप्त केल्या होत्या. त्यावेळी महसूल विभागाने तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननाविरुद्ध धडक कारवाई करत ठिकठिकाणचे बाळूचे रॅम्प उदूध्वस्त केले होते. पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध तपासकाम करून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
याकामी सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. संशयित आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद, फिर्यादीस झालेला विलंब, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व तपासकामातील त्रुटी विचारात घेऊन मालवण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी संशयित आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
