सिंधुदूर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांची मागणी
मालवण दि प्रतिनिधी
मालवण मधील सागरी जल पर्यटनाची मुदत २५ मे पर्यंत असून २६ मे पासून प्रवासी जल वाहतुकीबरोबरच विविध जलक्रीडा पावसाळी हंगामासाठी बंद राहणार आहेत. मात्र सध्या मालवणच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा म्हणजेच मे महिना सुरु असून मे महिन्याच्या मध्यानंतरच पर्यटकांचा ओघ मालवणात वाढत असल्याने २५ मे नंतर प्रवासी जलवाहतूक बंद ठेवल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीस ३१ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी मेरीटाइम बोर्डासह आमदार वैभव नाईक, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मेरीटाईम बोर्डाच्या नियमावली नुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रात होणारी जलवाहतूक व जलक्रीडा यांना दरवर्षी २५ मे पर्यंतच मुदत देऊन २६ मे पासून बंदी करण्यात येते. मालवणातील पर्यटन व्यवसायात सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व जलक्रीडा हे महत्वाचे घटक असून त्यांनाही हा नियम लागू होतो. मात्र पर्यटकांचा ओघ व हवामानाचा अंदाज घेऊन यापूर्वी काहीवेळा मेरिटईम बोर्ड व स्थानिक बंदर विभाग यांच्याकडून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीस मुदतवाढ देण्यात आली होती. तर गतवर्षी मे महिन्याच्या अखेरीस तारकर्ली येथे स्कुबा डायविंगची बोट उलटून दुर्घटना घडल्याने मेरिटईम बोर्डाने सरसकट सर्व प्रवासी जलवाहतूक व जलक्रीडा बंद करून मुदतवाढही नाकारल्याने त्याचा मोठा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर झाला होता.
या पार्श्वभूमीवर यावर्षी मे महिन्यात मालवणात पर्यटकांचा ओघ मोठा असून तो मे अखेरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच मे च्या १५ तारीख नंतर पर्यटकांची संख्या वाढली असल्याने पर्यटकांचा हिरमोड होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिशनने किल्ला प्रवासी वाहतुकीस ३१ मे पर्यंतची वाढ मिळावी अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन मेरिटईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बंदर विकास मंत्री, पालकांमंत्री आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना २५ मे नंतर प्रवाशी वाहतूक हंगाम बंद ठेवल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. मच्छीमार नौकांना ज्याप्रमाणे ३१ मे ही मच्छिमारी करण्याची शेवटची तारीख असते. त्यानुसार सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी व्यवसायिकांना देखील प्रवासी जलवाहतूक हंगाम ३१ मे पर्यंत कायम करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी या निवेदनात केली आहे. यापूर्वी बंदर विभागकडून सन २०१६ मध्ये अशी हंगाम वाढ देण्यात आली होती. त्यामुळे या वर्षासाठी २५ मे नंतर पुढील ६ दिवसासाठी हवामान खात्याचा अंदाज घेऊन बंदर विभागास हंगाम वाढवून देण्याबाबत आदेश व्हावेत, अशी मागणी मंगेश सावंत यांनी केली आहे.
