मागणी करूनही ट्रान्सफार्मर मिळत नसल्याने ग्रामस्थ संतप्त
⚡मालवण ता.२३-: तारकर्ली गावात कमी दाबाच्या वीज समस्येमुळे त्रस्त बनलेल्या ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिकानी सरपंच मृणाली मयेकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मालवण वीज वितरण कार्यालयात धडक देत ठाण मांडले.
दोन वर्षे सतत मागणी करूनही नवीन ट्रान्सफार्मर बसवण्याची कार्यवाही होत नाही. आहे त्या ट्रान्सफार्मर क्षमता वाढवून द्या अशी मागणी करून त्याचीही दखल घेतली जात नाही. त्याचा परिणाम म्हणून आता ऐन पर्यटन हंगामात मोठी समस्या निर्माण झाली आहे. एसी, फ्रीज, फॅन काहीच चालत नाही. पर्यटकाना त्रास सहन करावा लागत आहे. येथील पर्यटनावर मोठा परिणाम होत आहे. याला वीज वितरण जबाबदार असून तात्काळ कार्यवाही झालीच पाहिजे. अशी भूमिका सरपंच, ग्रामस्थ व येथील पर्यटन व्यावसायिकांनी घेतली.
आम्ही सातत्याने मागणी केली, जागा दिल्या मात्र ट्रान्सफॉर्मर मंजूर होत नाही. मात्र मागणी बाबत कोणतेही रेकॉर्ड नसताना काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले जात आहेत. कुठे किती बसवले याच्याशी आमचे देणेघेणे नाही मात्र आम्ही सातत्याने मागणी करत असताना आम्हाला नियम सांगितले जातात. अधिकारी मनमानी उत्तरे देतात. काय कारभार सुरू आहे? असे अनेक सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
तारकर्ली काळेथर सरपंच मृणाली मयेकर, ग्राप सदस्य जयवंत सावंत, मेघनात मयेकर, मिथिलेश मिठाबावकर, गणेश साळगावकर, महेंद्र चव्हाण, वैभव सावंत, संदेश सावंत, राजू आचरेकर, दत्ता करलकर, अजिंक्य पारकर, प्रतीक झाड, संतोष झाड उपस्थित होते.
तारकर्ली गावातील वायरी बांध वाडीतील २ ट्रान्सफार्मर चा लोड वाढवून मिळणे तसेच २ नवीन ट्रान्सफार्मर त्वरित बसवून मिळाले पाहिजेत. तसेच तारकर्ली कार्यक्षेत्रातील घरगुती कनेक्शन देवबाग लाईनला जोडली आहेत ती तारकर्ली लाईनला जोडण्यात यावीत. ग्रामस्थांना वारंवार होणारा त्रास दूर करावा. या मागण्या ग्रामस्थानी लावून धरल्या. मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा सरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे.
