⚡मालवण ता.१७-:
वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर या मार्गावरील केळबाई मंदिर ते वायरी या उर्वरित रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी पूर्व इशाऱ्यानुसार आज उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयासमोर तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापार्डेकर यांनी आमरण उपोषण छेडले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी सदर रस्ताकाम तात्काळ चालू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले असून दि. २४ मे पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने बापर्डेकर यांनी उपोषण स्थगित केले.
मालवण देवबाग मार्गावरील वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी पत्रव्यवहार केल्यावर हे काम सुरु झाले. मात्र या मार्गावरील केळबाई मंदिर ते वायरी या उर्वरित रस्त्याचे काम अर्धवट राहिलेले असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्याची साईडपट्टी खराब झालेली आहे.
यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे, त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी सुरेश बापर्डेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करून १५ मे पर्यंत काम न झाल्यास १७ मे पासून आमरण उपोषणास बसू असा इशारा दिला होता. मात्र हे काम न झाल्याने आज सुरेश बापर्डेकर यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण छेडले. यावेळी सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी बापर्डेकर यांची भेट घेऊन सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरुवात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहेत, असे सांगत २४ मे पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे सुरेश बापर्डेकर यांनी उपोषण स्थगित केले.
