उपसरपंच खतीब यांनी केली ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कालव्याची पाहणी
⚡बांदा ता.१६-: मोपा (गोवा) आंतरराष्ट्रीय विमानतळसाठी तिलारी शाखा कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने बांदा शाखा कालव्यात सोडण्यात आलेले पाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आले होते. यासंदर्भात उपसरपंच जावेद खतीब यांनी कालव्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर कालवा विभागाने तात्काळ कालव्यात पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे. आज उपसरपंच खतीब यांनी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कालव्याची पाहणी केली.
अचानक पाणी बंद करण्यात आल्याने याचा परिणाम बांदा शहर ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेवर झाला होता. शहरातील खासगी विहिरीच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याने परिसरात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत होते. खतीब यांनी तात्काळ तिलारी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली. अन्यथा ग्रामस्थानसह कालव्यात बसून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. काल रात्री उशिरा नेतर्डे येथून कालव्यात पाणी सोडण्यात आले. आज सकाळी पहाटेच पाणी बांद्यात पोहोचले.
उपसरपंच खतीब यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, शैलेश केसरकर, मिलिंद सावंत यांनी कालव्याची पाहणी करत कालव्या लगतच्या शेतकऱ्यांची देखील चर्चा केली.
