दशरथ कवटकर;भंडारी प्राथमिक शाळेत संस्कार वर्ग संपन्न
⚡मालवण ता.२४-: आज आपली नवीन पिढी बाहेरून मोहक दिसणाऱ्या अशा अनेक चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होत आहे. अशावेळी या संस्कारक्षम निरागस बालमनावर योग्य – अयोग्य यातील भेद ओळखण्याचे संस्कार तसेच ‘जे चांगले जगी’ त्याचा स्वीकार करण्याचे संस्कार होणे गरजेचे आहे. हे संस्कार भंडारी प्राथमिक शाळेच्या संस्कार वर्गातून केले गेले. त्यासाठी शिक्षक वृंदांचे कौतुक आहे. संस्कार वर्गसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानग्रहणाला योग्य दिशा प्राप्त होईल, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटीचे स्थानिक कमिटी चेअरमन दशरथ कवटकर यांनी केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित संस्कार वर्ग उपक्रमाचा सांगता समारंभाच्या वेळी अध्यक्ष स्थानावरून दशरथ कवटकर हे बोलत होते. यावेळी खजिनदार जॉन नरोना, शिक्षक आर. डी. बनसोडे, संगीत शिक्षक श्री बोवलेकर, पालक शिक्षक संघ सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतून एसटीएस परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना संस्कार वर्गामध्ये आवडलेल्या बाबींविषयी माहिती दिली. या वर्गात जे जे शिकवले ते आम्ही नियमितपणे आचरणात आणू असे आश्वासन दिले. तर असे संस्कार वर्ग फार कमी शाळांमधून आयोजित केले जातात. मात्र विद्यार्थी जीवनात सुजाण बालके तयार होण्यासाठी या संस्कार वर्गांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठी पालकांनीही विशेष परिश्रम घेणे गरजेचे आहे याची जाणीव आम्हाला झाली आहे, असे विचार पालकांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना शिक्षक श्री. बनसोडे यांनी चाकोरी बुद्ध अभ्यासक्रमातून बाहेर पडून हे प्रात्यक्षिकावर आधारलेले उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविले जावेत जेणेकरून राष्ट्राचे भावी आधारस्तंभ सजगपणे घडविले जातील. या कारणासाठी असे उपक्रम शाळांमध्ये राबविणे गरजेचे आहे, असे सांगितले. तर नाविन्यपूर्ण उपक्रमांना संस्थेचा सर्वतोपरी पाठिंबा असेल, असे जॉन नऱ्होना यांनी सांगितले. प्रास्ताविक शिक्षिका सौ. राधा दिघे यांनी तर सूत्रसंचालन शिक्षिका सौ.पूर्वी गोवेकर यांनी केले. आभार शिक्षक महेश लोकेगावकर यांनी मानले.
