मालवण ता.१
ब्रिज हा पत्त्यांचा खेळ असून बुद्धीबळाप्रमाणेच ब्रिज हा खेळही माईंड गेम असल्याने बुद्धी कौशल्यावर आधारित असणाऱ्या या गेममध्ये इथल्या तरुण तरुणींनी सहभाग दर्शवून या खेळाचा आनंद लुटावा. मालवण तालुका टेबल टेनिस अकॅडमीने इंडियन आईल कंपनीच्या सहकार्याने मालवण मध्ये टेबल टेनिस आणि ब्रिज खेळाचे प्रशिक्षण आयोजित करून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे अशा प्रकारच्या उपक्रमातूनच नवनवीन खेळाडू निर्माण होतील प्रतिपादन इंडियन आईल कंपनीचे माजी राष्ट्रीय खेळाडू आणि ब्रिज प्रशिक्षक श्री.उदय बेडेकर यांनी येथे बोलताना केले
मालवण टेबल टेनिस अकॅडमी आयोजित आणि इंडियन आईल पुरस्कृत टेबल टेनिस आणि ब्रिज प्रशिक्षण शिबीर मालवण टेबल टेनिस अकॅडमी रेवतळे मालवण येथे दि. १४ एप्रिल ते १६ एप्रिल २०२३ या कालावधीत संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबीरास मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षण शिबिरास माजी राष्ट्रीय खेळाडू आणि ब्रिज प्रशिक्षक श्री.उदय बेडेकर यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले
या शिबिराचा सांगता समारंभ महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग चे सचिव श्री.हेमंत वालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी व्यासपीठावर श्री.शुभम् मुळीक, शशांक घुर्ये , पंकज तुळसुलकर, प्रशिक्षक श्री.नितीन तळेकर, विष्णू कोरगांवकर उपस्थित होते. प्रारंभी विष्णू कोरगांवकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले यावेळी कोरगांवकर यांनी टेबल टेनिस आणि ब्रिज खेळाच्या प्रशिक्षणासाठी इंडियन ऑईल कंपनीने दिलेल्या योगदानाबद्दल व प्रोत्साहनाबद्दल ऋण व्यक्त केले
यावेळी महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग चे सचिव श्री.हेमंत वालकर यांनी प्रशिक्षणाला खेळाडूंचा मिळालेला प्रतिसाद पाहता ब्रिज आणि टेबल टेनिस खेळाला उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगून हे शिबीर पुरस्कृत केल्याबद्दल इंडियन आईल आणि आयोजित केल्याबद्दल मालवण टेबल टेनिस अकॅडमीला धन्यवाद दिले शेवटी श्री.शुभम् मुळीक यांनी आभार मानले
