उद्यापासून करणार काम बंद: प्रशासनाला दिले निवेदन
दोडामार्ग ता.१७-: कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या सफाई कर्मचारी व नळ कामगार यांचे दोन महिन्याचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारपासून बेमुदत काम बंद करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे येथील नगरपंचायतचे सर्व सफाई कर्मचारी व नळ कामगार यांना फेब्रुवारी व मार्च पर्यंतचे मानधन मिळालेले नाही. दोन महिन्यांपासून नगरपंचायत कार्यालयात वारंवार पाठपुरावा करण्यात आला मात्र नगरपंचायतीकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. कर्मचाऱ्यांचे मानधन न मिळाल्यास मंगळवार दिनांक १८ एप्रिल पासून बेमुदत काम बंद करणार असल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसे निवेदन रामदास शेळके, बाबू ताटे, सोमनाथ वरक, अरुण चव्हाण, अंकुश कदम, सुनील आरोसकर व मंदार चव्हाण यांनी दिले आहे.
चौकट-
[ नगरसेवक नांनचेनी वेधले लक्ष ]
नगरपंचायतीत कार्यरत असलेले सफाई व नळ कामगार अत्यंत चांगले काम करीत आहेत. दोडामार्ग शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी ठरत आहेत. परंतु, शहर सुंदर राहण्यासाठी दिवस-रात्र राबणाऱ्या हातांवर मात्र वेळेत वेतन मिळत नाही. दररोज सफाई करणाऱ्यांना तीन-चार महिने वेतन मिळत नाही. ही नगरपंचायतसाठी अशोभनीय गोष्ट आहे. कामगारांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने जीवितार्थ जलविणे मुश्किलीचे होत आहे. त्यामुळे कामगारांचे थकीत वेतन ताबोडतोब अदा करावे. तसेच यापुढेही त्यांचे वेतन वेळेवर देण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
