मालवण, दि प्रतिनिधी
जनवादी साहित्य संस्कृती चळवळ आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने २२ व २३ एप्रिल रोजी मालवण येथे दोन दिवसीय राज्यस्तरिय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात मराठी साहित्यातील अनागर (ग्रामीण) साहित्य, दलित- आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य, स्त्रीवादी साहित्य आणि महानगरी साहित्य आदी विविध प्रवाहांवर तसेच सूफी, लिंगायत व वारकरी परंपरेवर आजच्या काळाच्या संदर्भात चर्चाचिंतन करण्यात येणार आहे. या चर्चासत्रात महाराष्ट्र, गोवा आदी भागातील मान्यवर समीक्षक, लेखक व विचारवंत सहभागी होणार असल्याचे जनवादी साहित्य संस्कृती चळवळीचे अध्यक्ष कॉ. संपत देसाई, सचिव अंकुश कदम तसेच बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
दोन दिवशीय सत्राच्या अध्यक्षा सावंतवाडी येथे झालेल्या जनवादी
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा संध्या नरे-पवार या असणार आहेत
तर स्वागताध्यक्ष बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर हे
आहेत. या चर्चासत्राचे उद्घाटन धारवाडचे प्रसिद्ध लिंगायत परंपरेचे
विख्यात अभ्यासक रमजान दर्गा यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन
सत्रात ते लिंगायत परंपरेवर आपले विचार मांडणार आहेत.
दोन दिवसाच्या या चर्चासत्रात पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर होणाऱ्या चार सत्रांमध्ये अनागर (ग्रामीण) साहित्यावर लेखक समिक्षक आसाराम लोमटे (परभणी), दलित-आदिवासी साहित्यावर आघाडीचे विचारवंत सचिन गरुड (इस्लामपूर), महानगरी साहित्यावर जेष्ठ पत्रकार व लेखिका प्रतिमा जोशी
(मुंबई), स्त्रीवादी साहित्यावर पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार (मुंबई) व मुस्लिम साहित्य यावर लेखक- समिक्षक डॉ. रफिक सूरज (कोल्हापूर) आदी मान्यवर मांडणी करणार आहेत.
पहिल्या दिवशीच्या या सत्रानंतर सायंकाळी ७ वाजता मराठीतील आघाडीचे कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन होईल. त्यानंतर गोव्याचे आंबेडकरवादी कवी दादू मांद्रेकर यांच्या कवितेवर मिलिंद माटे व त्यांचे सहकारी नृत्य नाट्य सादर केले जाणार आहे.
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी साहित्य-संस्कृतीच्या संदर्भात संतपरंपरा या विषयावर चर्चा होईल. या सत्रात सूफी परंपरेवर अभ्यासक व विचारवंत सरफराज अहमद (सोलापूर) तसेच वारकरी परंपरेवर पत्रकार सचिन परब (मुंबई) हे मांडणी करणार आहेत.
दोन दिवसाच्या चर्चासत्राचा समारोप महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर व मराठीतील आघाडीचे कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या चर्चासत्राला महाराष्ट्रातील कार्यकर्ते, साहित्याचे अभ्यासक, साहित्य रसिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात येत आहे. निवासाच्या व्यवस्थेसाठी चर्चासत्रातील सहभागाची आगाऊ नोंदणीसाठी संपत देसाई (७०८३८२८०८१), अंकुश कदम (८७८८८९६०४२) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
