‘त्या’ रस्त्यासाठीची खडी, डांबर संपले का…?

वायरीतील नागरिकांचा संतप्त सवाल ;

⚡मालवण ता.०९-: मालवण शहरातील वायरी- तारकर्ली या रस्त्यावरील लायब्ररी शाळा ते सुहास हडकर दुकानापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण न झाल्याने स्थानिक नागरिक संतप्त बनले असून या रस्त्याच्या कामासाठीची खडी, डांबर संपले का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपालिकेने या रस्त्याचे काम तत्काळ हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 मालवण नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या भरड ते वायरी तानाजी नाका या तारकर्लीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यात गेल्या दोन महिन्यात गवंडी घर ते दिघे घर आणि पुढे हडकर दुकान ते मारुती मंदिर या दोन पट्ट्यांच्या ठिकाणचे खड्डे बुजविण्या बरोबर डांबरीकरण करण्यात आले. शिवाय गेल्या काही दिवसात गवंडी घर ते दिघे घर या ठिकाणच्या रस्त्याचे पुन्हा काम करण्यात आले. मात्र या दोन पट्ट्यांच्या मधील लायब्ररी शाळा ते हडकर दुकान या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असतानाही त्याची डागडुजी नगरपालिकेकडून करण्यात न आल्याने खडी, डांबर संपले आहे का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

 दरम्यान, या रस्त्याच्या कामाबाबत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता गतवर्षी मंजूर असलेल्या दोन पट्ट्यांच्या ठिकाणची कामे ही पावसामुळे तसेच अन्य कारणांनी झाली नाही. ती आता करण्यात आली. लायब्ररी शाळा ते हडकर दुकान या रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात येत असून येत्या महिनाभरात या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
You cannot copy content of this page