सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचा डी. एड. बेरोजगार बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा

⚡कणकवली ता.०६-: डी एड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीने डी. एड. बेरोजगार तरुण -तरुणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्याध्यापक संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.

शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे या प्रमुख मागणी बरोबर तात्काळ शिक्षक भरती करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 1200 बेरोजगांरावरील अन्याय दूर करावा अशी त्यांची मागणी आहे. गेली अनेक वर्षे हे बेरोजगार नोकरी नसल्याने चिंतेत आहेत. अनेक जणांना पालकांनी काबाडकष्ट करुन नोकरी मिळेल या आशेने शिक्षण दिले आहे. 2012पासून शिक्षक भरती बंद ठेवून या बेरोजगारांना अन्याय केला. उपोषणाला अनेक दिवस होऊनही शासनाच्यावतीने याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. शासनाने त्वरित शिक्षक भरती करुन यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्याची विनंती आपण शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर आणि शिक्षक आम. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे करु असे आश्वासन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी दिले.

You cannot copy content of this page