*मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा प्रमुख बनण्याचा प्रयत्न करू नये; निलेश राणे यांचा इशारा*
मालवण दि प्रतिनीधी : शिवजयंती उत्सवावर ठाकरे सरकारने निर्बंध घातल्याप्रकरणी निषेध व्यक्त करणाऱ्या भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान दिल्याप्रमाणे आज शेकडो कार्यकर्ते व भाजप कार्यकर्त्यांच्या सोबतीने किल्ले सिंधुदुर्गवर जाऊन थाटामाटात शिवजयंती साजरी केली. आम्ही उत्साहात आणि धुमधडाक्यात शिवजयंती साजरी केली असून आम्हाला कोणतेही सरकार थांबवू शकत नाही. यापुढेही मरेपर्यंत अशीच साजरी करू. यात राज्य सरकारने आडवे येण्याचा प्रयत्न करू नये. आजचा दिवस हा साऱ्यांच्या दैवताचा दिवस असताना शिवजयंतीला सरकारने १४४ कलम लागू केले ही दुर्दैवी गोष्ट आहे. हा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुख्यमंत्री फक्त प्रशासनाचे प्रमुख असून त्यांनी महाराष्ट्राचा प्रमुख बनण्याचा प्रयत्न करू नये असा रोखठोक इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला. किल्ले सिंधुदुर्गवर थाटामाटात शिवजयंती साजरी करणार, मला अडवून दाखवा असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकार व शिवसेनेला दिला होता. या पार्श्वभूमीवर आज निलेश राणे यांनी शेकडो शिवभक्त व भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मालवण शहरातून देऊळवाडा ते बंदर जेटी अशी भव्य मोटरसायकल रॅली काढली. बंदर जेटी येथून बोटीतून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जेटीवर दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषाने आसमंत दणाणून सोडला. त्यानंतर किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात दाखल होत निलेश राणे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर शिवप्रार्थना म्हणण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, अशोक सावंत, मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, बाब परब, सुदेश आचरेकर, महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर, नगरसेविका पूजा सरकारे, रश्मी लुडबे, नगरसेवक आपा लुडबे, विजय केनवडेकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी निलेश राणे म्हणाले, आज शिवजयंती उत्सवाला राज्यभरात ठिकठिकाणी उत्साहात शिवजयंती साजरी करत आहेत. आम्हाला कोणतेही सरकार थांबवू शकत नाही. मात्र शिवजयंतीला येऊ पाहणारे असंख्य शिवभक्त ठिकठिकाणी अडकले आहेत. पोलिसांनी मध्ये अडचणी निर्माण केल्या मात्र पोलिसांना आम्ही समज दिली आहे. शिवजयंतीचे महत्व पोलिसांनाही पटले असेल. आजचा दिवस मोठा असून आमच्या दैवताचा दिवस आहे. आज जगभरात २०० देशात शिवजयंती साजरी होत आहे. सरकारला याचे काही पडले नसेल, धर्माचे आणि छत्रपतींचेही सरकारला काही पडलेले नाही. पण शिवभक्त म्हणून आम्ही मरेपर्यंत शिवजयंती उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करणारच. ठाकरे- फाकरे कुठलेही सरकार आम्हाला थांबवू शकत नाही असा इशारा यावेळी निलेश राणेंनी दिला. यावेळी निलेश राणे म्हणाले शिवजयंती दिवशी जमावबंदीचे १४४ कलम लागू करणाऱ्या राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे. शिवनेरी किल्ला आणि जुन्नर या गावी देखील हे कलम लागू केले. ही दुर्दैवी गोष्ट आहे. हजारो शिवभक्त शिवनेरी किल्ल्याकडे पोहचले मात्र ते अडकून पडले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मात्र हेलिकॉप्टरने जाणार आणि बिचारा शिवभक्त खाली उभा राहिला. महाराजांच्या पालखीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री आदित्य ठाकरे हे तिघे पुढे उभे आहेत आणि शिवरायांच्या वंशजांना मागे ठेवले जाते. वंशजांना पालखीला हात लावायलाही दिला जात नाही. हे दुर्दैवी असून खासदार छत्रपती संभाजी भोसले यांनी सरकारच्या मागे फरफटत जाऊ नये. त्यांच्या आडनावाला मोठे वलय आहे. म्हणून त्यांनी त्याच रुबाबात राहिले पाहिजे, हे वलय कधी पडता नये, असेही निलेश राणे म्हणाले.
