आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे म्हणजे देशसेवा-प्रा.खानोलकर

⚡वेंगुर्ला ता.०४-: देशभक्ती म्हणजे आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे होय असे प्रतिपादन प्रा.वैभव खानोलकर यांनी व्याख्यानात केले.

वेंगुर्ला येथील लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ‘व्यसनमुक्तीसाठी युवक‘ या संकल्पनेवर सात दिवसीय निवासी शिबिर तुळस येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रा.वैभव खानोलकर यांचे ‘आजचा युवा आणि देशप्रेम‘ यावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.पूजा कर्पे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खानोलकर म्हणाले की, देशाबद्दल नागरिक म्हणून असणारी कर्तव्य आणि जबाबदारी या मेडिकल कॉलेजच्या युवाई समोर व्यक्त होताना भारताला जर महासत्ता बनवायचे असेल तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारला नावे ठेवण्यात व्यस्त न राहता आपण निवडणुकीच्या रिगणात उभे राहिले पाहिजे. केवळ स्वप्न न बघता ते पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटीने अभ्यास केला पाहिजे.
जगात जेव्हा जेव्हा क्रांती झाली, परिवर्तनाची लाट आली तेव्हा ते कार्य हे फक्त तरूणांनी केले. मग ते स्वराज्याचे तोरण बांधणारे जाणते राजे शिवछत्रपती, शिकागोला भारतीय तत्त्वज्ञान ओजस्वी भाषेत मांडणारे योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद, पसायदान मागणारे ज्ञानेश्वर माऊली हे सगळे तरूण होते. तर पाश्चात्य देशांत ही परिवर्तन करण्याची किमया सुध्दा युवा समाज सुधारकांनी केली. देश हाच देव मानून आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून जर कार्य केले तर निश्चितपणे ती देशभक्ती ठरेल. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून केलेल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरुणाईची ताकद आणि सकारात्मक प्रयत्न करण्याची जबाबदारी या देशातील युवा वरच असल्याची जाणीव त्यांनी यावेळी या विद्यार्थ्यांना करून दिली.
फोटोओळी- होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.वैभव खानोलकर यांच्या हस्ते झाले.

You cannot copy content of this page