हत्तींचा प्रवास दोडामार्गच्या दिशेने ?

केर -मोर्ले सोडून हत्ती वायंगणतड मध्ये दाखल

दोडामार्ग ता.०४-:

गेल्या काही दिवसांपासून केर – मोर्ले परिसरातच बस्तान मांडलेल्या हत्तींचा प्रवास आता तालुक्याच्या दिशेने सुरू झाला आहे.सोमवारी रात्री वायंगणतड येथे टस्कर व पिल्लू असा दोन हत्तींचा कळप दाखल झाला .त्यामुळे वायंगणतड परिसरात एकच खळबळ उडाली असून हत्तींचा प्रवास मागील आठ वर्षांपूर्वीप्रमाणे पुन्हा तालुक्याच्या दिशेने तर होणार नाही ना ? या शक्यतेने वनविभागाची मात्र झोप उडाली आहे.
सोमवारी रात्री गेल्या काही दिवसांपासून केर – मोर्ले परिसरात दिसणारा हा हत्तींचा कळप सोमवारी रात्री अचानक वायंगणतड येथे डेरेदाखल झाला.त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली. या भागात मोठया प्रमाणात केळी बागायती आहेत .तर अनेकजणांनी नाचणीची शेतीही केली आहे.याच नाचणीच्या शेतात सोमवारी रात्री हत्तींनी शिरकाव केला.गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत हत्तींना माघारी जाण्याची आळवणी यावेळी नुकसानीने हतबल झालेला वायंगणतड मधील शेतकरी व नागरिक करीत होते मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. वायंगणतड गावाला लागूनच तिलारी नदी असल्याने या भागात पाणी उपलब्ध आहे .तर नदीकाठच्या घोटगे , परमे , कुडासे गावात केळी बागायती मोठया प्रमाणात आहेत .त्यामुळे हा कळप तालुक्याच्या दिशेने वाटचाल करण्याची दाट शक्यता आहे .तसे झाल्यास मागच्या आठ वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती होऊ शकते. परिणामी नुकसानीच्या भीतीने नदीकाठच्या शेतकऱ्यांची गाळण उडाली आहे.तर हत्तींचा प्रवास तालुक्याच्या दिशेने सुरू झाल्याने वनविभागाची मात्र झोप उडाली आहे.

You cannot copy content of this page