बांदा – सटमटवाडी सीमा तपासणी नाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

ठेकेदाराची पोलीस ठाण्यात तक्रार

बांदा ता.०३-:
बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्यावर अतिक्रमण करून व आरटीओ कार्यालयाची दिशाभूल करत नाका सूरू करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी ठेकेदार सुवर्ण बिल्डकॉन कंपनीचे व्यवस्थापक मनोजकुमार अब्रोल यांनी बांदा पोलिसात आज तक्रार अर्ज दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी सकाळी नाक्यावर येत सदभाव व अदानी कंपनीच्या लोकांकडून नाक्याचा ताबा घेत नाका अडथळे टाकून पुन्हा बंद केला. याठिकाणी बेकायदा ताबा घेतलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या महागड्या सामानाची अफरातफर केल्याचेही त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमुद केले आहे.
नाक्याच्या कामाचे थकीत देयक शिल्लक असल्याने दोन कंपन्यात वाद सुरु आहेत. हा वाद न्यायप्रविष्ठ असून याबाबत सावंतवाडी न्यायालयाने जोपर्यंत सदभाव व अदानी ग्रुप कंपनी कामाचे पूर्ण देयक देत नाही तोपर्यंत नाक्याचा ताबा हा सुवर्ण बिल्डकॉन कंपनीकडे राहील असा आदेश दिला आहे. त्यामुळे सदभाव व अदानी कंपनीने आरटीओ ची दिशाभूल करत नाक्याचे परस्पर उदघाटन करण्याचा प्रयत्न केल्याचे अब्रोल यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.
आज सकाळीच अब्रोल हे नाक्यावर दाखल झालेत. त्यांनी याठिकाणी नाक्याचा बेकायदा ताबा घेतलेल्या सदभाव व अदानी कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांना येथून निघून जाण्याची विनंती केली. यावेळी कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयात चर्चा करण्यात आली. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने अब्रोल यांनी रीतसर कारवाई करण्याचा इशारा देताच कंपनीचे १५ हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांनी तेथून काढता पाय घेतला.
यावेळी अब्रोल यांनी तपासणी नाक्याच्या दोन्ही बाजूकडील लेनची व साहित्याची पाहणी केली. त्यावेळी त्यांना लॅपटॉप, कॉम्प्युटर व इलेक्ट्रिकलचे महागडे केबल व अन्य किमती साहित्य निदर्शनास न आल्याने या साहित्याची अफरातफर झाल्याची नोंद त्यांनी केली आहे. अब्रोल यांनी नाका ताब्यात घेताच याठिकाणी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच नाक्याचे प्रवेशद्वार चारही बाजूकडून अडथळे टाकून बंद करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page