बांदा आठवडा बाजारात महिलेची लांबविली पर्स

अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांत तक्रार.

बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवडा बाजारात चोरांचा सुळसुळाट पुन्हा सुरू झाला आहे. सोमवारी सकाळी गोव्यातून बांदा येथे आठवडा बाजारासाठी आलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांने लांबविली. याबाबत सदर महिलेने बांदा पोलीसात तक्रार नोंदविली आहे. बांदा उभा बाजार येथे गजबजलेल्या ठिकाणी पिशवीतून पर्स लांबविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यात सदर महिलेचे मोबाईल व चांदीची पैजण व रोख रक्कम चोरीला गेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेडणे-गोवा येथील महिला आपल्या नवऱ्यासोबत आठवडा बाजारासाठी बांदा येथे आली होती. सुरुवातीला त्यांनी खरेदी केली व शेवटी घरी परतत असताना बांदा उभा बाजार येथे एका दुकानात कॉस्मेटिक सामान खरेदी करत होती. दरम्यान तिच्या हातात असलेल्या बाजाराच्या पिशवीत वर ठेवलेले पाकीट अज्ञात चोरट्यांने लांबविले. तिचे कॉस्मेटिक सामान खरेदी झाल्यानंतर सदर महिलेने घरी फोन करण्यासाठी मोबाईल काढायला गेली असता पिशवीत पर्स नसल्याचे उघड झाले. मात्र आठवडा बाजार असल्याने चोरटा कोण हे आढळून आले नाही, मात्र येथील शेजारील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटा दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सदर पर्स मध्ये एक चांदीची पैजण, रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाइल व रोख रक्कम असा मुद्देमाल होता. याबाबत लागलीच सदर महिलेने बांदा पोलीसात तक्रार दिली असून अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page