ठेकेदार, डंपर व्यावसायिक यांनी पैसे न दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप:अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना राहावे लागलेय ताटकळत
बांदा/प्रतिनिधी
येथील सीमा तपासणी नाक्याच्या उद्घाटनाला ठेकेदार कंपनी सुवर्ण बिल्डकॉन व स्थानिक डंपर व्यावसायिक यांनी आपल्या कामाचे पैसे अदा न केल्याने विरोध केला. त्यामुळे सकाळी ७ वाजता उद्घाटनासाठी दाखल झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे व स्थानिक लोकप्रतिनिधीना ताटकळत थांबावे लागले. ठेकेदार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. याठिकाणी आरटीओ चे जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.
सुवर्ण बिल्डकॉन कंपनीचे व्यवस्थापक मनोजकुमार अब्रोल यांनी कालच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन नाका परस्पर सुरु करण्याच्या प्रक्रियेला आक्षेप घेतला होता. त्यामुळे आजच्या उदघाटन सोहळ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
आज भल्या पहाटेच आरटीओ चे अधिकारी व कर्मचारी नाक्यावर दाखल झाले होते. उदघाटन सोहळ्यासाठी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब व ग्रामपंचायत सदस्य यांना निमंत्रण देण्यात आले होते. सकाळी ७ वाजताचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. मात्र स्थानिक डंपर व्यावसायिक व सुवर्ण बिल्डकॉन चे कर्मचारी यांनी आपल्या कामाचे लाखो रुपयांचे देयक थकीत असल्याने नाक्याच्या उदघाटनाला विरोध केला. जोपर्यंत आपले पैसे मिळत नाही तोपर्यंत उदघाटन करू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी डंपर व्यवसायिकानी नाक्यावरच ठिय्या मांडला.
दुपारपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु होती. त्यामुळे नाक्याचे आज उदघाट्न होण्याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे.
