⚡बांदा ता.२८-: सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र विनायक चंद्रकांत देसाई यांची भारतीय सैन्य दलात “लेप्टंनपदी” नुकतीच हैद्राबाद येथे नियुक्ती झाली आहे. त्यामुळे डेगवे-आंबेखणवाडीच्या ग्रामस्थांनी त्यांचा ब्राह्मणीतीर्थ क्षेत्र”आंबेखणवाडी येथे सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेगवे माजी सरपंच मंगलदास देसाई होते.
यावेळी श्री ब्राह्मणी स्थळाचे पुजारी वामन देसाई यांनी विधीवत पुजा केली. प्रास्ताविक भाषणात माजी सरपंच मंगलदास देसाई यांनी, डेगवे गांव हा सैनिक पेशा असणाऱ्यापैकी एक आहे. या गावातील अनेक सुपुत्राने पोलीस व सैनिक पेशा पत्करुन देशसेवा केली आहे. याचा आमच्या डेगवे ग्रामस्थांना सार्थ अभिमान वाटतो आहे. विनायक देसाई यांच्यासारखी जिद्द व चिकाटी पाहून आमचे इतर बांधव त्यांची प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रात काम करतील असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो. आजच्या युवाशक्तीला त्यांनी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
विनायक देसाई यांचा सत्कार जेष्ठ ग्रामस्थ मनोहर देसाई यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला. यावेळी त्यांची आई व कुटुंबातील सर्व सदस्य व ग्रामस्थ आर्वजून उपस्थित होते. डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबईचे सरचिटणीस उल्हास देसाई यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
सत्काराला उत्तर देताना विनायक देसाई म्हणाले, माझे अनेक सत्कार झाले परंतु आज माझा सत्कार घरातील लोकांनी केला आहे तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तो मी कदापीही विसरू शकत नाही. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली ती मला माझ्या आयुष्यात उर्जा देणारी आहे. मी ज्या भुमीत जन्माला आलो ज्या मातीत वाढलो त्या मातीतील लोकांनी केलेले कौतुक निश्चितच मला प्रेरणादायी आहेत.
यावेळी शामसुंदर देसाई, गोपाळ देसाई, सदानंद देसाई, वामन देसाई, विष्णू देसाई, तुकाराम देसाई, आत्माराम देसाई, विजय देसाई, योगेश मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.
लेप्टंन विनायक देसाई यांचा डेगवे आंबेखणवाडीतर्फे सत्कार
