नॅब नेत्र रुग्णालयाचे ९ एप्रिल रोजी उद्घाटन

सुप्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया करणार उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी भटवाडी येथे नॅब संस्थेच्या माध्यमातून दृष्टीबाधित गोरगरिबांसाठी उभारण्यात आलेल्या ‘नॅब नेत्र रुग्णालया ‘चे ९ एप्रिल रोजी सुप्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया यांच्या शुभहस्ते लोकार्पण होणार आहे. जिल्ह्यातील दृष्टी बाधितांवर अत्यंत माफक दरात या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. तर दारिद्र्य रेषेखालील नेत्र रुग्णांसाठी सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड अर्थात नॅबचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी डॉ. नेमिनाद खोत, बंनजी वस्तवाल, आबा कशाळीकर, जिगजिन्नी आदी उपस्थित होते.
     या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईड इंडीयाचे अध्यक्ष हेमंत टकले, नॅब महाराष्ट्रचे  रामेश्वर कलंत्री, नॅब महाराष्ट्र सचिव गोपी मयुर, सहाय्यक सचिव मुक्तेश्वर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, रोटरी गव्हर्नर डॉ. गिरीष मसुरकर, रोटरी माजी गव्हर्नर संग्राम पाटील, माजी गव्हर्नर धोंड इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईड ही संस्था सन १९९९ मध्ये स्थापन झाली असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयातील दृष्टीबाधितांसाठी गेली ३२ वर्षे कार्य करीत आहे. जिल्हयातील दृष्टीबाधितांकरीता नेत्र रूग्णालय निर्माण करण्याच्या जिद्दीने ०९ एप्रिल २०१६ रोजी नॅब च्या नेत्ररुग्णालयाच्या इमारतीची पाया भरणी केली होती. सर्वसामान्यांसाठी व दृष्टीबाधितांसाठी उपयुक्त असे नेत्र रुग्णालय, नॅब कार्यालय, औषधालय आणि कम्युनिटी हॉल अशा बहुउद्देशीय हेतूने ही इमारत उभारण्याचे काम हाती घेतले. मध्यंतरी २ वर्षे कोरोना कालावधीमुळे थोडा विलंब झाला होता तरी आज आपण नॅब संस्था कार्यालय व नेत्र रुग्णालयाची इमारत पूर्ण करू शकलो. त्याचे सर्व श्रेय आमचा विद्यार्थी वर्ग, आश्रयदाते, माझे सर्व सहकारी यांचे आहे. व या सर्व काम खूप जणांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे मी आभार व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
       नॅब सिंधुदुर्ग व नॅब सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हे नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी चे कामकाज चालविले जाणार आहे. नॅब सांगली ही संस्था गेली २५ वर्षे त्यांचे नेत्र रुग्णालय अत्यंत यशस्वीपणे चालवत आहे. अत्यंत आधुनिक तपासणी यंत्रणा, ऑपरेशन विभाग, अत्यंत कुशल डॉक्टरांचा ताफा तसेच नॅब सांगली चे सर्व पदाधिकारी मंडळी त्यामध्ये नॅब सांगलीचे अध्यक्ष श्री मुकुद फाटक, पदाधिकारी राहुल देशपांडे, विनायक पटवर्धन, गौश्री श्रीरंग मराठे,संतोष पाठारे या सर्वांचे या कामी खुप मोलाचे सहकार्य आहे.
     आमच्या सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अत्याधुनिक अशा नेत्र रुग्णालयाची अत्यंत गरज होती. या नेत्र रुग्णालच्या माध्यमातून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयातील व सर्व स्तरातील दृष्टीबाधितांची उत्तम सोय होणार आहे. अत्यंत कमी खर्चात येथे सर्वाना इलाज करून घेता येईल व दारीद्रय रेषेखालील नेत्र रुग्णांसाठी सर्व इलाज मोफत करण्यात येणार आहेत. या ठिकाणी आलेला रुग्ण पैसे नाही म्हणून माघारी जाणार नाही त्याच्याकडे खरोखरच पैसे नसतील तर त्याच्या उपचार केले जाणार आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये ६० ते ७० हजार रुपये घेण्यात येणाऱ्या डोळ्यांच्या ऑपरेशनला फक्त पंचवीस हजार रुपये करण्यात येणार आहे. गोरगरिबांची सेवा करावी व रुग्णांना चांगली सेवा द्यावी या हेतून ही संस्था काम करणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       लवकरच रोटरी क्लब च्या ग्लोबल ग्रॅन्ट च्या माध्यमातून आपल्या नॅब संस्थेला अॅम्बुलन्स मंजुर होईल. त्याद्वारे खेडोपाडी जाऊन नेत्रतपासणी शिबीरे घेणे शक्य होणार आहे. तसेच दृष्टीबाधित रुग्णांना ने आण करण्याकरीता याचा वापर होणार आहे. या आणि अशा सामाजिक बांधिलकीच्या कार्यात आपणा सर्वांच्या सहकार्याची भी अपेक्षा करतो. सर्वांच्या सहकार्याच्या बळावरच आपल्याला हे मोठे पवित्र कार्य पुढे न्यायचे आहे. त्यामुळे या इमारतीच्या वरील मजल्याचे काम अजून बाकी आहे त्यासाठी सुद्धा मदत करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page