कंदळगावात वाळू व्यावसायिकाच्या आत्महत्येने खळबळ

मालवण (प्रतिनिधी)

कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर च्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला तोंडवळी येथील वाळू व्यावसायिक निलेश गोविंद तोंडवळकर (वय ४२) यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी दिसून आल्याने खळबळ माजली आहे प्राथमिक तपासात निलेश तोंडवळकर यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असले तरी त्यांनी आत्महत्त्या का केली असावी याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही .

दरम्यान, मालवण पोलीसांनी शवविच्छेदन केल्यानंतर निलेश यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला निलेश हे तोंडवळी गावच्या सरपंच दिक्षा तोंडवळकर यांचे पती होत. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तोंडवळी वरचीवाडी येथे राहणारे निलेश तोंडवळकर हे वाळूचा व्यवसाय करतात. आज सकाळी ते मालवणात सामान आणण्यासाठी जातो असे सांगून आपल्या ताब्यातील ज्युपिटर दुचाकी घेऊन घराबाहेर पडले. सकाळी साडे नऊ वाजता ते ओझर मार्गांवरून दुचाकीने जाताना काही जणांना दिसले. मात्र सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आचरा मालवण मार्गावरील कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर च्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना व वाहन चालकांना दिसून आला. याबाबत माहिती मिळताच निलेश तोंडवळकर यांचे चुलत भाऊ गणेश तोंडवळकर यांच्यासह मित्र परिवाराने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, सुशांत पवार व हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी त्याठिकाणी निलेश यांचा मोबाईल व ओझर विद्यामंदिरच्या प्रवेश द्वाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर त्यांची ज्युपिटर गाडी सापडून आली.

यानंतर रुग्णवाहिकेतून निलेश यांचा मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. यावेळी शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांच्यासह तोंडवळी ग्रामस्थ उपस्थित होते. निलेश तोंडवळकर यांच्या पश्चात पत्नी, आई, मूलगी असा परिवार आहे. तोंडवळी गावच्या सरपंच दिक्षा तोंडवळकर यांचे ते पती होत.

You cannot copy content of this page