ग्रामपंचायत आणि घे भरारी महासंघ यांचे आयोजन
बांदा/प्रतिनिधी
वाफोली ग्रामपंचायत व घे भरारी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
वाफोली येथील सोसायटी सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलनाने झाली.
यावेळी आरोग्य शिबिरामध्ये महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सी.बी.सी., थायरॉईड, कॅल्शियम, तसेच रक्तातील काविळीची तपासणी व त्यावरील उपचारासाठी मोफत औषधे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, स्त्रीरोगतज्ञ डॉ. नेत्रा सावंत, विलवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.पुष्पलता मणेरीकर-सावळ आदी उपस्थित होते. यावेळी शिबिरासाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. डॉ. नेत्रा सावंत यांनी उपस्थित महिलांना स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या विविध रोगांचे व उपचार पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. गावातील तब्बल १८० महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाफोली विकास सोसायटीच्या चेअरमन सौ. धनश्री विलास गवस यांनी केले तर आभार उपसरपंच विनेश गवस यांनी मानले.
