बांदा/प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी अतोनात छळ सहन करून आपली जीवनयात्रा संपवली त्याच शंभूछत्रपतींच्या पवित्र देहाचे ज्वलज्वलंत तेजस प्रतिक म्हणून मंगळवार दिनांक २१ रोजी बांदा शहरात सायंकाळी ४ वाजता “मुकपदयात्रा” काढण्यात येणार आहे.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी हिंदुधर्मासाठी केलेल्या बलिदानास श्रद्धांजली वाहण्यासाठी मुकपदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पदयात्रा श्री देव बांदेश्वर मंदिर येथून सुरु होणार आहे.
तत्पूर्वी दुपारी २.३० वाजता वढू बुद्रुक येथून निघालेली ज्योत (मशाल) दोडामार्ग येथून बांद्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी येथे येणार आहे. याठिकाणी ज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. गेले महिनाभर याठिकाणी बलिदान मास पाळण्यात येत आहे.
मुकपदयात्रा श्री देव बांदेश्वर मंदिर येथून सुरुवात होऊन छत्रपती संभाजी महाराज चौक, मोर्येवाडा, तेली तिठा, गांधीचौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गडगेवाडी येथे आल्यानंतर शंभु राजांना श्रद्धांजली अर्पण करून सांगता होणार आहे. हा पदयात्रेत सहभागी होणाऱ्यांनी पादत्राने घालू नयेत असे निलेश सावंत पटेकर यांनी कळविले आहे.
