क्रिकेटसोबत आरोग्य शिबीर राबवा

बाळा परब यांचे आवाहन : पाडलोस रवळनाथ मित्र मंडळाच्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा : प्रतिनिधी
पाडलोस रवळनाथ मित्र मंडळाने सामाजिक, क्रीडा क्षेत्रात टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. याद्वारे गावात विविध उपक्रम राबविणे सर्वांच्या सहकार्याने शक्य होईल. क्रिकेट खेळासोबत आरोग्याच्यादृष्टीने शिबिरे राबविल्यास सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब यांनी दिली.

पाडलोस येथे रवळनाथ मित्र मंडळ आयोजित रवळनाथ चषक उद्घाटनावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, ग्रामपंचायत माजी सदस्य नंदा गावडे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, संचालक राघोबा गावडे, निहार इंटरप्राईजेसचे निहार गावडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर, पाडलोस माजी उपसरपंच महादेव गावडे, माजी चेअरमन सुभाष करमळकर, पोलिस पाटील रश्मी माधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रशांत माधव, तसेच आनंद गावडे, दिनेश चव्हाण, दशरथ पंडित, जयेश गावडे, दत्ताराम गावडे, तुकाराम गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनीही रवळनाथ मित्र मंडळ आयोजित रवळनाथ चषक स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. पाडलोस गावातील मुलांनी खेळातून आपले कौशल्य दाखवत उंच पातळी गाठावी. तसेच भविष्यात पाडलोस गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळा परब पुढे म्हणाले की, केवळ खेळ महत्त्वाचा आहे असंच नाही तर सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सर्वच मंडळांनी रक्तदान शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून जिल्ह्याचे आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न करूया. यात प्रत्येकाने सहभाग घ्यावा असे आवाहनही बाळा परब यांनी केले. राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब यांनी सर्व खेळाडूंना टी-शर्टचे मोफत व वाटप केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन शिक्षक मोहन पालेकर व रंजन नाईक यांनी केले. बंटी गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page