पुढील तपासाची दिशा ठरवणार मालवण पोलीस
मालवण (प्रतिनिधी)
व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी नेणाऱ्या नऊ संशयितांना मसुरे – मसदे मार्गावरील वेरळ माळरानावर काल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सापळा रचून ताब्यात घेत सुमारे २५ कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त करून नऊ जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आज या नऊ जणांना मालवण पोलीस स्थानकाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने मालवण पोलिसांकडे सोपविला असून याबाबत पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.
काल मसुरे – मसदे मार्गावर वेरळ माळरानावर व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी नेणाऱ्या नऊ संशयितांना जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधिक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. त्याठिकाणी सापळा रचल्यानंतर दोन चारचाकी गाडी आणि एक मोटारसायकल तेथे आली, आणि त्याची तापसणी पथकाने केली असता ओमनी कार नंबर (एमएच ४८ एडब्यु ५४२३) यातून १२ कोटी ५२८ ग्रॅम वजनाचा उलटी सदृश पदार्थ तर मारूती व्हॅन नंबर (एम ०७ एजी ३६१० ) यातून ११ किलो ७३६ ग्रॅम वजनाचा उलटी सदृश पदार्थ जप्त करण्यात आला. याबरोबरच एक मोटारसायकल क्रमांक (एमएच ०७ झेड ६४८८) ही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या अंबरग्रीसची अंतराराष्ट्रीय बाजारात सुमारे २५ कोटी एवढी किंमत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटी जप्त करण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई आहे. या कारवाईत एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस निरीक्षक आर. बी. शेळके, सहायक पोलीस निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेडकाँस्टेबल अनिल धुरी, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, काँस्टेबल प्रथमेश गावडे, यश आरमारकर, रवी इंगळे, चंद्रहास नार्वेकर, चंद्रकांत पालकर हे सहभागी झाले होते. या कारवाईत मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव आणि त्यांच्या टिमनेही महत्वपूर्ण सहकार्य केले.
याबाबत तुषार चंद्रकांत घाडी (वय ३२, रा. भरणी घाडीवाडी ता. कणकवली), बजरंग आत्माराम कदम (वय ५४ वर्षे, रा. ओझर्डे इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली), सतिष शांताराम मोरे (वय- ५४ वर्षे, रा. रावलनगर, भाईंदर इस्ट ठाणे), अजित नारायण घाडीगावकर (वय- ४६, रा. कळसुली गांगोसखलवाडी ता. कणकवली), अनिकेत प्रकाश चव्हाण (वय ३२, रा. मसूरे गडघेरावाडी ता. मालवण), शशांक प्रकाश चव्हाण (वय ३४, रा. तरेळे बाजार ता. कणकवली), हेमंत अशोक मेथर (वय ४९, रा. कोळंब ता. मालवण), पांडुरंग चंद्रकांत राणे, (वय-३८, रा. मसूरे, कावावाडी, ता. मालवण), प्रविण चंद्रकांत भोई (वय – ३५, रा. भोयचे केरवडे, कुडाळ) या नऊ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्व नऊही संशयीतांवर वन्य जीव संरक्षक अधिनियम १९७२ कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या घटेनची माहिती वन विभागाला दिली. या प्रकरणाचा तपास मालवण पोलिसांकडे सोपविण्यात आला असून या नऊ जणांना मालवण पोलीस स्थानकाकडून तपास व चौकशी बाबतच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस हवालदार सुहास पांचाळ हे करत आहेत.
यापुर्वीही मालवणमध्ये व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) सदृश पदार्थ सापडून आला होता. तसेच अंबरग्रीस तस्करी प्रकरणी सांगली येथून काही संशयीतांना ताब्यात घेतल्यानंतर सिंधुदुर्ग मधील तळाशील कनेक्शन समोर आले होते. आता पुन्हा मालवणमध्ये जिल्ह्यातील मोठी कारवाई करण्यात आली असून यात येवून स्थानिकांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या स्थानिकांच्या सोबत इतर काही सहकारी आहेत काय ? उलटी पदार्थ विक्रीचे इतर कनेक्शन आहे काय ? याचा तपास करण्यासाठी संशयीतांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
