कोकणात एक्सलन्स क्लस्टर सेंटर उभारण्यात येणार

*चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडेल यांची माहिती

*💫मालवण दि.१७-:* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर या संस्थेमार्फत राज्याच्या सहा विभागात उद्योग व्यवसायाशी निगडित सर्व गोष्टींचा अंतर्भाव असणारे एक्सलन्स क्लस्टर सेंटर उभारण्यात येणार असून याची सुरुवात कोकण विभागात एक्सलन्स सेंटर उभारून करण्यात येणार आहे. या सेंटरला स्व. एकनाथ ठाकूर यांचे नाव देण्याचा ठराव संस्थेच्या कार्यकारिणी सभेत घेतला असून कोकणातील उद्योग व्यवसाय विकसित करण्याचे काम या सेंटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी तोंडवळी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील नित्यानंद रिसॉर्ट येथे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर या शिखर संस्थेच्या कार्यकारिणीची सभा बुधवारी संपन्न झाली. या सभेस राज्यभरातील कार्यकारिणी सदस्य तसेच स्थानिक उद्योजक, व्यापारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष संतोष मंडलेचा हे बोलत होते. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दशरथी, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, सागर नागरे, डॉ. दीपक परब, सदस्य विजय केनवडेकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी संतोष मंडलेचा म्हणाले, चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था व्यापार, उद्योग, शेतकरी यांचे प्रतिनिधित्व करते. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संस्थेतर्फे राज्याच्या सहा विभागात वेगवेगळ्या विषयांवरील क्लस्टर – एक्सलन्स सेंटर उभरण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात कोकणातून करण्यात येणार आहे. या सेंटरच्या उभारणीसाठी राज्य सरकारचे साहाय्य प्राप्त होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच सेंटर साठी लागणाऱ्या गोष्टीसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असूनही पर्यटनाच्या दृष्टीने म्हणावे तसे काम जिल्ह्यात झालेले नाही, असे आजच्या सभेत उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे पर्यटनासह सर्व विषयांशी निगडित असणारे एक्सलन्स सेंटर कोकणात उभारण्यात येणार असून त्याद्वारे येथील पर्यटन, व्यवसाय, उद्योग कसे विकसित करता येतील यासाठी प्रयत्न राहणार आहेत. मंत्री, राजकीय पुढारी यांच्याशीही सल्ला मसलत करून हे सेंटर साकारले जाणार आहे, असेही मंडलेचा म्हणाले. या सेंटर मध्ये इक्विपमेंट व ट्रेनिंग सेंटर असे दोन विभाग असणार आहेत. इक्विपमेंट विभागात जागतिक दर्जाच्या मशीन उपलब्ध करण्यात येतील. त्याचा लाभ छोट्या शेतकऱ्याला घेता येईल. तसेच आंबा, काजू, नारळ व इतर फळांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर ट्रेनिंग सेंटर मध्ये व्यवसाय योजना कशा राबवाव्यात याचे मार्गदर्शन राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांमार्फत देण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना सुविधा व प्रेरणा मिळेल. कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणूनही या एक्सलन्स सेंटरचा उपयोग होईल असे यावेळी उपाध्यक्ष उमेश दशरथी यांनी सांगितले. जीएसटी विरोधातील बंदला पाठिंबा केंद्र सरकारने जीएसटी कर प्रणाली लागू केल्यावर त्याचे आम्ही स्वागत केले होते. तसेच जीएसटी बाबत राज्यभर प्रबोधन केले. मात्र आता जीएसटी करात ज्या नवीन दुरुस्त्या केल्या गेल्या, जीएसटी नंबर रद्द करण्याच्या तरतुदी केल्या गेल्या त्याबाबत देशभर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे जीएसटी विरोधात कॉन्फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या शिखर संस्थेमार्फत देशव्यापी बंद दि. २६ फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आला आहे. या बंद ला चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा देण्याचा ठरावही सभेत घेण्यात आल्याचे अध्यक्ष मंडलेचा यांनी सांगितले. या बंद आंदोलनात वाहतूक बंद व चक्क जाम करण्यात येणार आहे. या महाराष्ट्रात या आंदोलनाचे नेतृत्व चेंबर ऑफ कॉमर्स करणार आहे, सरकारने जीएसटी बाबतच्या अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे, असे यावेळी ललित गांधी यांनी सांगितले. विविध प्रकारच्या मालाच्या विक्रीसाठी आणि छोट्या छोट्या उद्योग व व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्समार्फत MACCIA आत्मनिर्भर महाराष्ट्र हे ऍप विकसित करण्यात येणार आहे असे यावेळी उमेश दशरथी यांनी सांगितले. चेंबर ऑफ कॉमर्स विकासात महत्वाची भूमिका घेऊ शकेल. इनोव्हेटिव्ह ग्रीनफिल्ड बाबत चर्चा करून संस्थेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, व संबंधित विभाग प्रमुख यांच्या भेटी घेऊन त्यांना यामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. कोल्हापुरचे विमानतळ चेंबरच्या प्रयत्नातून सुरू झाले. सिंधुदुर्गातील विमानतळ सुरू झाल्यास आंबा, काजू, बायोप्रॉडक्ट्स बाहेरगावी निर्यात होऊ शकतात, असे यावेळी आशिष पेडणेकर यांनी सांगितले. विमानतळ कार्यान्वित व्हावे यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे चेंबरमार्फत मागणी करण्यात येणार आहे, असे ललित गांधी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page