कुडाळ महिला रुग्णालय येत्या दोन महिन्यात जनतेच्या सेवेसाठी सुरू

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ग्वाही : विविध समस्यांसंदर्भात काका कुडाळकर यांनी घेतली भेट

सिंधूदुर्गनगरी ता १७ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, कुडाळ येथील महिला रुग्णालय, प्रस्तावीत वैद्यकीय महाविद्यालय आदी विविध मुद्यांवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात भेट देण्याचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना देण्यात आले आहे. दरम्यान कुडाळ येथील महिला रुग्णालय येत्या दोन महिन्यात जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आम्हाला दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत काका कुडाळकर बोलत होते. यावेळी बाळ कनयाळकर, भास्कर परब, बाळा सातार्डेकर आदी उपस्थित होते. यावेळी काका कुडाळकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकतीच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेण्यात आली. या भेटी दरम्यान जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने बाबतच्या समस्या, रिक्त पदे, कुडाळ येथील महिला रुग्णालय याकडे आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा इतर जिल्ह्याच्या मनाने खूप दुबळी असून ती अधिक सक्षम व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवून आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान कुडाळ येथील महिला रुग्णालयाची इमारत पूर्ण होवून अनेक वर्षे झाल्याने ही इमारत जनतेच्या सेवेत दाखल करण्यात यावी याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी हे रुग्णालय येत्या दोन महिन्यात नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशी ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाला दिली असल्याचे काका कुडाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले. महिला रुग्णालय सुरू करताना सुरुवातीला कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी या रुग्णालयासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावा याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. दरम्यान याकडे आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांचेही लक्ष वेधण्यात आले असून या रुग्णालयासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. कुडाळ ग्रामीण रुग्णालय वगळता अन्य ठिकाणी डायलिसिस सेवा सुरू आहे. मात्र या रुग्णालयात जागा अपुरी असल्याचे कारण देत ही सेवा सुरू केली जात नाही. मात्र नागरिकांची मागणी पाहता येथेही ही सेवा सुरू करण्यात यावी याकडे जिल्हा शक्य चिकित्सक यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. जिल्हा निर्मितीच्या वेळी झालेली चूक आता पुन्हा नको रुग्णालय हे हायवे नाजूक नजीक असावे जेणेकरून रुग्णांना जास्त लांब जावे लागू नये. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली त्यावेळी जिल्हा रुग्णालय हे हायवे पासून २ ते ३ किमी अंतरावर बांधण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना रुग्णालयात येण्यासाठी वाहतूक खर्च सहन करावा लागतो. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधताना जिल्हा निर्मितीच्या वेळी जिल्हा रुग्णालय एका कोपऱ्यात बांधण्यात आले ती चूक आता सुधारली जावू शकते. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय हायवे नजिक बांधण्यात यावे जेणे करून रुग्णांना सोयीस्कर असेल याकडेही आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे काका कुडाळकर यांनी सांगितले. फोटो ओळ – १) पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदश संघटक सचिव काका कुडाळकर यांनी माहिती दिली.

You cannot copy content of this page