डिंगणे ग्रामस्थाची मौन नर्मदा परिक्रमा

सलग तीन वर्षे चार हजार किमीचा पायी प्रवास ः आध्यात्मिक उंची वाढविण्यासाठी प्रयत्न

⚡बांदा ता.०८-; आध्यात्मिक उंची वाढविण्यासाठी मौनव्रत धारण करून डिंगणे येथील नवनाथ लक्ष्मण नाईक यांनी वयाच्या 59 व्या वर्षी तीसरी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. अन्नपदार्थ न खाता केवळ फलाआहारावर चार महिने चार हजार किलोमीटर पायी प्रवास करत  परिक्रमा पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यशस्वी केला. परिक्रमा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीला अंतर्मुख होण्यापलीकडेही बरच काही शिकवून जातो. आज आपण सलग तीन वर्षे परिक्रमा केल्याने त्रिवार नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यासारखे श्री.नाईक यांनी सांगितले.
नर्मदा ही मध्यप्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो व ती अरबी समुद्रास मिळते. डिंगणे येथील नवनाथ लक्ष्मण नाईक यांनी वयाच्या 57 व्या वर्षी पायी परिक्रमा करण्याचा संकल्प करून सुमारे चार हजार किमी चालत तो तडीस नेला. 117 दिवस परिक्रमेला लागतात, यात दिवसाला 30 किमीचा प्रवास केला जातो.  यांनी 2020 साली चार हजार किमीच्या पहिल्या परिक्रमेत केवळ जेवण करत होतो. त्यानंतर आपल्या जीवनात परिवर्तन होत अमुलाग्र बदल झालेला दिसून आला. 2021 साली त्यांनी दुसरी परिक्रमा करताना अध्यात्म वाढण्यासाठी जेवण न करता केवळ दुध व फळ खाल्ली, यात 110 दिवस लागले. त्यावेळी तिकडे काहीप्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध झाल्या. तर 2022 रोजी सुरू केलेल्या परिक्रमेत त्यांनी बदल केला. आपली आध्यात्मिक उंची वाढविण्यासाठी चार महिने मौनव्रत धरत चार हजार किमीचा टप्पा 117 दिवसात पायी पार पाडला. यामध्ये मौन बाळगत केवळ फलाहार केल्याचे ते म्हणाले.
वयाच्या 54व्या वर्षीपर्यंत नवनाथ नाईक यांना चालणे शक्य होत नव्हते. दासबोध हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे. त्यामुळे सज्जनगड येथे 12-13 वर्षे पायी जात समर्थांची साधना केली आणि त्यानंतर परिक्रमेसा ध्यास उराशी बाळगला. त्यामुळे धार्मिक आध्यात्मिकता स्वस्त बसू देत नव्हती. आजोबा आपले गुरू असून त्यांचा आध्यात्मिक वारसा मिळाला व प्रगती झाल्याचे श्री नाईक यांनी सांगितले. श्री समर्थ रामदास स्वामी, नर्मदा माता यांचा आशिर्वाद देवी सातेरी माऊली माता आणि माझे आई-वडिल यांच्या प्रेरणेने, आजोबा कृष्णा मोपकर, मामा रामा मोपकर यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या अध्यात्म जीवनाचा प्रवास सुरू झाला व नर्मदा मातेची परिक्रमा सलग तीन वेळा करू शकतो असे त्यांनी भावनिक होऊन सांगितले.

परिक्रमेचे महत्व व नियम

नर्मदा परिक्रमा कुठल्याही घाटावरून करू शकता. नर्मदा मातेचे शेवटच जल ओमकारेश्वरलाच अर्पण करावे लागते. तसेच जर अमरकंटक वरून सुरूवात केली तरी अमरकंटकमध्ये परिक्रमा पूर्ण होते परंतु शेवटच जल ओमकारेश्वरला मातेच्या चरणीच अर्पण करावे लागते, असा परिक्रमेचा नियम असल्याचे ते म्हणाले. शरिरातील शक्ती बोलण्यात खर्च घालतो त्या शक्तीची साठवण आपल्या शरिरात होते. तसेच बोलण्यात खर्च होणारा वेळ नर्मदा नदीची भक्ती करता येईल आणि नर्मदा नदीची परिक्रमा सुलभ होईल. परिक्रमा म्हणजे केवळ चालणे नाही तर स्वतःच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी जी मातेने परिक्रमा दिलेली आहे त्याचे अनुकरण करावे. प्रत्येक तिर्थक्षेत्राचे महत्व, आश्रमची महती काय आहे ते जाणून घ्यावे. असे झाल्यास जीवनात नक्कीच बदल होतो.

फोटो——–
परिक्रमेबद्द्ल माहिती देताना नवनाथ नाईक.

You cannot copy content of this page