शाळकरी मुलाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू …

निरवडे येथील घटना ;पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

⚡सावंतवाडी ता.०४-: निरवडे-भंडारवाडी येथे विहिरीत पडल्यामुळे ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. आरव जानू खरात असे त्याचे नाव आहे. ही दुर्घटना शनिवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याला उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार असल्याने आरव हा सकाळी शाळेतून लवकर घरी परतला. त्यानंतर घरात दप्तर ठेवून खेळायला जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर घरापासून काही अंतरावर असलेल्या विहीरीत तो पाय घसरून पडला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या सहकारी मुलाने त्याच्या घरी धावत जात घटनेची माहिती दिली.
त्यानंतर त्वरीत घरातील व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचले मात्र तत्पूर्वी तो विहिरीतील पाण्यात बुडाला होता. त्याला तात्काळ निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथून अधिक उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page