⚡मालवण ता.०२-: तोंडवळी येथील सुरूबनातील६०० मीटर मार्गासह एकूण साडे पाच किमी रस्त्याच्या कामासाठी कालपासून तोंडवळीवासियांनी सुरुबनात उपोषण छेडले असताना आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक आमदार निधीतून दिलेल्या २० लाख रुपये निधीच्या शासकीय मंजूरीचे पत्र आज दुपारी उपोषणस्थळी सरपंच नेहा तोंडवळकर यांना दिल्यानंतर तोंडवळी वासियांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित केले. या रस्त्यासाठी बांधकाम विभागाने परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा, रस्त्याचे काम होण्यात दिरंगाई केल्यास पुन्हा उपोषण छेडू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
तोंडवळी येथील सुरूबनातील वन विभागाच्या जागेतील ६०० मीटर रस्त्याचे काम वन विभागच्या परवानगी अभावी गेली अनेक वर्षे रखडले आहे. या रस्त्यासह एकूण साडे पाच किमीच्या रस्त्याची देखील दुरावस्था झाली आहे. या पूर्ण रस्त्यासाठी सुमारे दोन कोटी पेक्षा निधीची आवश्यकता आहे. सुरूबनातील रस्त्यासाठी वन विभागाची परवानगी घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही कार्यवाही होत नसल्याने रस्ता कामाच्या मागणीसाठी कालपासून ग्रामस्थांनी सरपंच नेहा तोंडवळकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुबनात आमरण उपोषण छेडले. रस्त्याबाबत निधी उपलब्धता व प्रशासकीय मान्यतेबाबत जोपर्यंत प्रशासकीय पातळीवर लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे तोंडवळी ग्रामस्थांनी सांगितले होते. या उपोषणात उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुजाता पाटील, स्नेहल पाटील, मानसी चव्हाण, अनन्या पाटील, माजी सरपंच आबा कांदळकर, जयहरी कोचरेकर, गणेश तोंडवळकर, संजय केळुसकर, दीपक कांदळकर, वासुदेव पाटील, आशिष पाटील, ताता टिकम, ऍड ओंकार केणी यासह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.
आज दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांनी उपोषण सुरू ठेवले होते. या उपोषणाची दखल घेत आज प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही होऊन कणकवली येथील
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कमलिनी प्रभू यांनी दुपारी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या स्थानिक आमदार निधीतून यापूर्वी दिलेल्या वीस लाख रुपये निधीस जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पत्र अभियंता प्रभू यांनी सरपंच नेहा तोंडवळकर यांना सुपुर्द केले. या रस्ता कामाबाबत प्रस्ताव सादर करण्यास किमान डांबरीकरणास कोणतीही अडचण येणार नसल्याचे प्रभू यांनी सांगितले. तसेच प्रस्ताव सादर करण्यास केवळ निधी नाही तर निधीची प्रशासकीय मान्यता हवी होती ती मिळाली आहे, यानंतर पर्यावरण आणि वन विभागाच्या परवानगी साठी प्रस्ताव सादर करावे लागतील यादृष्टीने साधारण महिनाभराचा अवकाश लागेल असेही प्रभू यांनी सांगितले. त्यामुळेच ग्रामस्थांनी पुढील तीन महिन्याचा अवकाश देत उपोषण स्थगित केले.
रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, कामात दिरंगाई होऊ नये, वन विभागाच्या परवानगीसाठी आम्ही पाठपुरावा करू, आमची सहनशीलता संपत आली आहे, पुन्हा उपोषण करण्यास भाग पाडू नये, कामास विलंब झाल्यास पुन्हा उपोषणास बसू असा उशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
यावेळी उपस्थित असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांनी रस्त्याच्या मानाने निधी अपुरा असला तरी आवश्यकता भासल्यास आमदार वैभव नाईक यांच्या मार्फत निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनीही ग्रामस्थांना फोनवरुन उपोषणास पाठिंबा जाहिर करत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आवश्यकता भासल्यास निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी ठाकरे गटाचे बाबी जोगी, समीर लब्दे, सिद्धेश मांजरेकर यांच्यासह वासुदेव पाटील, आबा कांदळकर, दिपक कांदळकर, उपसरपंच हर्षद पाटील, संजय केळूसकर, गणेश तोंडवळकर यांसह अन्य ग्रामस्थ, महिला आदी उपस्थित होते.
