उद्धव ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला विश्वास;शरद पवार यांचे ते वैयक्तिक मत असल्याचेही सांगितले
मालवण ता.२६(प्रफुल्ल देसाई)-: राज्यातील सत्ता संघर्षावर आज मालवण दौऱ्यावर असलेल्या शिवसेना( ठाकरे गट) नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करताना सुप्रीम कोर्टात जी सुनावणी चालली आहे त्या सुनावणीच्या अनुषंगाने सर्व पक्षांची मते जाणून घेतल्यानंतर शिंदे गटाचे सोळा आमदार डिस्ˈक्वॉलिफ़ाइड होणार असल्याने राज्य सरकार मध्ये काय राहील ? राज्यातील मिंधे सरकार औट घटकेचे असून लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. हा विश्वास व्यक्त करतानाच श्री देसाई यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच ते वैयक्तिक मत असल्याचे सांगितले.मालवण दौऱ्यावर आलेल्या सुभाष देसाई यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते
शिवसेना नेते सुभाष देसाई पुढे म्हणाले, शिवसेना सोडून जे गेले त्या गद्दारांचा शिवसेनेवर यापूर्वी आणि आताही कोणताही परिणाम झालेला नाही. शिवसेना तेवढ्याच ताकदीने पुन्हा उभी राहिली असे सांगून ते म्हणाले वेंगुर्ला येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला पन्नास माणस नव्हती आठ महिन्यात दिपक केसरकरांना सिंधुदुर्गात सभा घेण्याची हिम्मत झाली नाही आमच्यामध्ये हिम्मत आहे म्हणून आव्हान देतोय , निवडणुका घ्या ! पण निवडणुका घेण्याचीही मिंदे सरकारला हिम्मत होत नाही. पण केव्हा ना केव्हा निवडणुका घ्याव्या लागतील त्यावेळी गद्दारांसह भाजपला भुईसपाट करू असे ते म्हणाले
ते पुढे म्हणाले, कोकणात महाविकास आघाडी तर्फे आगामी निवडणुका लढविल्या जातील. कोकणातील जागा या आमच्या असल्याने आम्हाला जागा कोण देणार असे सांगत ते म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवन्त मान, ममता दिदी, नितीशकुमार, स्टॅलिन या सर्वांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवडणुकांना सर्वांनी एकत्र येऊन सामोरे जाऊया असे सांगितले आहे त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आल्यानंतर भाजप काय टिकणार असा सवाल त्यांनी केला. सिंधुदुर्गात आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही अधिक जोमाने उभे राहत आहोत आणि यापुढे आम्ही इतके जोरात येऊ की भाजप – मिंदेंच्या हाताला काही राहणार नाही. सिंधुदुर्गातील विधानसभेच्या तिन्ही जागा आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत भाजपाने घेतलेल्या सर्व्हेत १४० जागा दाखविण्यात आल्याने भाजप निवडणुका घ्यायला घाबरत असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.
