मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील दांडी मोरेश्वर रांज येथे धुप प्रतिबंधक बंधारा बांधणे आणि श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे धुप प्रतिबंधक बंधारा बांधणे या दोन कामांसाठी २०२०-२१ आणि २०१७-१८ अंतर्गत निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर यास भाजपाचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी आक्षेप घेतला आहे. या दोन्ही सालच्या अर्थसंकल्पांमध्ये या एकाही बंधाऱ्यासाठी मंजुरी मिळालेली नाही. संपूर्ण दांडी किनारपट्टीवर बंधारा कम रस्ता होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने भाजपाचे युवा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या कामासाठी पहिल्या टप्प्याचा निधी मंजूर झाला आहे, मात्र हे श्रेय स्वतःला घेण्याबरोबरच दांडी येथील नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी ठाकरे गटाकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप श्री. केनवडेकर यांनी केला आहे.
मालवणमधील उद्धव ठाकरे गटाकडून मालवण तालुक्यातील किनारपट्टीतील जनतेला कायम फसवी आश्वासने देऊन खासदार व आमदार यांच्या मार्फत जनतेला फसवण्याचा एककलमी कार्यक्रम करताना पाहावयास मिळत आहे. दांडी किनारी धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर व आठ दिवसात कामाला सुरुवात अशा प्रकारची माहिती विरोधकांकडून प्रसिद्ध करण्यात आली. यासंबंधी २०१७ – १८ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. २०२० – २१ च्या अर्थसंकल्पात आर्थिक मंजुरी देण्यात आली आणि आठ दिवसात कामाला सुरुवात होणार आहे, असे सांगून मच्छीमारांची व मालवणच्या जनतेची फसवणूक करून धूळफेक केली जात आहे, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे. २०१७-१८ चा अर्थसंकल्पात या कामाची कोणत्याही तरतुदीची नोंद नाही. २०२०-२१ मध्ये पण अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद केलेली निदर्शनास येत नाही. अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झाल्यावर त्याचा आराखडा बनवला जातो. लांबी, रुंदी, उंची ठरवली जाते. अशा प्रकारचे कोणतेही आदेश पतन विभागाला किंवा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे शासनाने दिलेले निदर्शनात येत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजनात हे काम समाविष्ट नाही व तरतूदही नाही किंवा साधी टिपणी पण नाही. असे असताना आठ दिवसात कामाला सुरुवात व कोणता ठेकेदार काम करणार आहे हे घोषित करणे म्हणजे ठेकेदाराला हाताशी धरून जनतेला फसवण्यासारखे आहे. असा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे गट करताना दिसत आहे, असा आरोप केनवडेकर यांनी केला आहे.
मालवण बंदर जेटी ते मोरेश्वर मंदिर ते मोरयाचा धोंड्यापर्यंत बंधारा कम रस्ता व पार्किंग व्यवस्थेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बंधाऱ्याची खास बाब म्हणून मंजुरी देण्यात यावी अशी लेखी स्वरूपात समक्ष भेटून मागणी केली होती. याचाच पाठपुरावा माजी खा. निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत मंत्रालयात सुरू केला होता. त्यास अनुसरून धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे पहिल्या टप्प्याचे काम २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेचे, झालेल्या चर्चेचे मंत्रालयातील मिनिट्स भाजपाकडे उपलब्ध आहे, असेही केनवडेकर यांनी म्हटले आहे.
