श्री देव रामेश्वराणे घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची भेट…

ऐतिहासिक भेटीने बनले भावनिक वातावरण

मालवण दि प्रतिनिधी
आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कांदळगाव येथील आपले राऊळ सोडून मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीला निघालेल्या कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराने आज दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास छत्रपतींची भेट घेतली या भेटी दरम्यान श्री देव रामेश्वर आणि त्याच्या पंचायतनसह रयते समवेत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदीमाया आदिमाता आई भवानीचे दर्शन घेतले यावेळी दोन्ही शिवांच्या वतीने एकमेकांना भेटीचे नजराणे देण्यात आले.

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, आदिमाया श्री देवी भवानी  आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या भेटीच्या अनुपम सोहळ्यास आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरातून प्रारंभ झाला.
श्री देव रामेश्वर आपल्या पंचायतनासह रयतेला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला निघाल्याचे समजताच कांदळगाव मालवण मार्गावर दुतर्फा ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. श्री देव रामेश्वर हा आपल्या भागातून जाणार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा गुढ्या तोरणे उभारण्यात आली होती. श्री देव रामेश्वर आपल्या लवाजम्यासह जात असताना ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. तसेच सुहासिनी पंचारतीने ओवळीत होत्या. हे सर्व करतानाच भाविकजन आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्याचे साकडेही घालत होते. 

मालवण फोवकांडा पिंपळ मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आल्यानंतर दुपारी १ वाजता मालवण मेढा येथील जोशी मांडावर रामेश्वराचे आगमन झाले. याठिकाणी जोशीवाडा बाळ गोपाळ मित्र मंडळ,  सिंधुदुर्ग किल्ला होडी प्रवासी वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, रामचंद्र महादेव आचरेकर, यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सतीश आचरेकर मित्रमंडळाने थंडपेयाचे वाटप केले.

महाप्रसादाचे भाविकांना वाटप झाल्यानंतर श्री देव रामेश्वराने होडी व्दारे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान केले यावेळी श्री देव रामेश्वर देव तरंग,आणि त्याचे पंचायतन तसेच हजारोच्या संख्येने असलेली रयत यांच्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला होडी प्रवासी वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, रामचंद्र महादेव आचरेकर, यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत होडी सेवा पुरविण्यात आली होती अत्यंत सुलभतेने आणि सुरक्षितेने या तिघांनी ही सेवा पुरविल्याबद्दल भाविकांच्या वतीने आभार मानले जात होते.

किल्ले सिंधुदुर्गवर गेल्यानंतर किल्यावरील प्रमुख मानकरी सकपाळ कुटुंबीय यांनी स्वागत केलं.त्यानंतर श्री देव रामेश्वर आणि पंचायतन कडून  छत्रपती शिवाजी महाराज यांना पारंपरिक पद्धतीने जिरे टोप, शाल, वस्त्रालंकार प्रदान करून सन्मान करण्यात आला .तसेच श्री देव रामेश्वर आणि अन्य देवता व वारेसूत्र यांचा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावतीने शेला पागोटे देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी माता मंदिरात श्रीदेव रामेश्वर व अन्य देवतांनी भेट देत शुभ आशीर्वाद आदान प्रदान केले. किल्ले सिंधुदुर्ग वरील अन्य मंदिराना ही भेट दिली.

सायंकाळी उशिरा किल्ले सिंधुदुर्ग वरून श्री देव रामेश्वर हा आपल्या लवाजम्यासह मालवणकडे परतीला निघाला. दांडी येथील श्री देव दांडेश्वराला श्रीफळ देऊन मानसन्मान केल्यानंतर  वाजत गाजत समुद्र किनारा मार्गे श्री देव रामेश्वर हा छत्रपतींच्या अध्यात्मिक गुरू मौनीनाथ महाराज यांच्या मेढा येथील पुरातन अशा मौनीनाथ मंदिरात विराजमान झाला. उद्या सकाळी रामेश्वर हा आपल्या लवाजम्यासह कांदळगाव येथे परतीच्या प्रवासाला निघणार आहे.

भेट सोहळय़ात आज होणारे कार्यक्रम

११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता कुशेवाडा (मेढा) येथे पारंपरिक भेट, सकाळी १० वाजता रामेश्वर मांड (बाजारपेठ) येथे भाविकांच्या दर्शनासाठी थांबणार, त्याठिकाणी रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे महाप्रसाद, सायंकाळी  ४ वाजता रामेश्वर मांड येथून कांदळगाव येथे प्रयाण. रात्री ९ वाजता रामेश्वर मंदिर येथे आगमन व समारोप होणार आहे.

You cannot copy content of this page