रास्ता रोखो करीत जखमींचा खर्च उचलण्याची केली मागणी;मालवण पोलीस ठाण्यात मांडला ठिय्या
मालवण (प्रतिनिधी)
काळसे होबळीचा माळ येथे काल मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने पाच महिलांना मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू होऊन पाच महिला जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज मयत काळसेकर यांचे कुटुंबीय व काळसे येथील ग्रामस्थ यांनी आक्रमक पवित्रा घेत मालवण पोलीस ठाणे गाठून ठिय्या मांडला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपरचा मालक जोपर्यंत मालवणात येत नाही आणि जखमी महिलांच्या उपचाराची जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तर काळसे रमाईनगर येथे ग्रामस्थानी रस्ता रोको केला.
दरम्यान, मालवण पोलिसांनी पादचारी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालक इकलास इस्माईल शेरखान (वय ३३, रा. चंदगड कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काळसे येथे काल सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यानं भरधाव डंपरने शेतातून काम करून परतत असलेल्या पाच महिलांना धडक दिली. या भीषण अपघातात काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुक्मिणी विठोबा काळसेकर (५५)अनिता चंद्रकांत काळसेकर (५५) प्रमिला सुभाष काळसेकर (४०) प्रज्ञा दिपक काळसेकर (३५) या चौघीजणी जखमी झाल्या होत्या . जखमी महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे तर पोलिसांनी मद्यधुंद चालकाला काल ताब्यात घेतले .
या अपघातानंतर आक्रमक बनलेल्या काळसेकर कुटुंबीय व काळसे ग्रामस्थांनी आज मालवण पोलीस स्थानकात धाव घेत ठिय्या मांडला.
काळसे ग्रामस्थानी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दर्शवत डंपरचा मालक जोपर्यंत मालवणात येत नाही आणि जखमी महिलांच्या उपचाराची जबाबदारी घेत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत मयत रुक्मिणी काळसेकर यांचा मुलगा दीपक काळसेकर यांनी पोलिसांना निवेदन सादर केले. सदर डंपर चालकावर सदोष मनुष्यवध प्रकरणी भा.द.वि. कलम ३०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान पोलीस व ग्रामस्थानी डंपर मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपार पर्यंत डंपर मालक हजर झाला नव्हता.
दरम्यान, आज दुपारनंतरही अपघातग्रस्त डंपरचा मालक न आल्याने मयताचे नातेवाईक आणि काळसे रमाईनगर येथील ग्रामस्थांनी आज दुपारी आणि सायंकाळी काही वेळ रास्ता रोको केला. या रास्ता रोको मध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, विलास कुडाळकर माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, भूपेश चेंदवणकर राजन आंबेरकर यांच्यासह काळसे रमाईनगर ग्रामस्थ आणि महिला सहभागी झाल्या होत्या.
डंपर चालकास पोलीस कोठडी
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन मालवण पोलिसांनी पादचारी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालक इकलास इस्माईल शेरखान (वय ३३, रा. चंदगड कोल्हापूर) याच्यावर भा.द.वि. कलम ३०४, २७९, ३३७, ३३८ व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले.
डंपर मालक हजर; नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात
दुपारी उशिरा डंपर मालक आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू होती. तर नातेवाईकांनी संध्याकाळी मृतदेह ताब्यात घेतला अशी माहिती मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
रुक्मिणी काळसेकर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी
दरम्यान सायंकाळी अपघातातील डंपरचा मालक सायंकाळी चंदगड येथून मालवण पोलीस स्थानकात हजर झाल्यानंतर मयत रुक्मिणी काळसेकर यांचा मुलगा दीपक काळसेकर , माजी सभापती राजेंद्र परब , प्रमोद काळसेकर आणि नातेवाईक यांनी डंपर मालकासोबत चर्चा करून मयत आणि जखमी महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी डंपर मालकाने ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेउन प्रमोद काळसेकर , दीपक काळसेकर यांनी दूरध्वनी वरून आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर काळसे रमाईनगर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले पण काळसे गावातील रस्त्यावर चार दिवसात गतिरोधक न घातल्यास आणि अवजड वाहनांना वेगमर्यादा घालून न दिल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिला. रात्री शोकाकुल वातावरणात अपघातात मयत झालेल्या रुक्मिणी काळसेकर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले.
