वृध्द महिलेचा जागीच मृत्यू;चार महिला गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
मालवण दि प्रतिनिधी
चिरे आणण्यासाठी चौके मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (एम. एच. ४६ एफ. ०८२७) रस्त्यावरून जाणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक देत उडविल्याने काळसेकर नामक ६० वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात अन्य चार महिला गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत
अपघात घडल्यानंतर पळून जाणाऱ्या डंपर चालकास पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील काळसे रमाई नगर मधील काही महिला या मोल मजुरीच्या कामाला जातात या महिला आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कामे आटपून घरी परतत असताना चौके मालवणच्या दिशेने चिरे आणण्यासाठी भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे काळसेकर ही वृद्धा जागीच मृत पावली तर अन्य रमाई नगरातील चार महिला गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालय हलविण्यात आले आहे यातील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेला माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक झाजूरणे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता
