⚡कणकवली ता.०३’-: कणकवली शहरातील एस. एम. हायस्कुलच्या १९८३- ८४ या शालेय वर्षाची दहावीची बॅच ३९ वर्षांनी एकवटली. आचरा येथे जामडुल बेटावर बॅचने जणू एकदिवसीय शाळाच भरवली.
काही वर्षांपूर्वी झालेल्या बॅचच्या हॉट्सअँप ग्रुपमुळे संपलेल्या संपर्काना पुन्हा जिवंत केले. त्यातून गेट टूगेदरची संकल्पना मांडली गेली आणि ती सर्वांनीच उचलून धरली. यासाठी ठिकाण निश्चित झाले अन् पन्नाशी पार केलेले हे सर्व विद्यार्थी रविवारी सकाळी आपल्या एसएम हायस्कुलचा पटांगणावर गोळा झाले. प्रशालेच्या आठवणी जागवत, प्रशाला वंदन करतानाच उत्फुर्तपणे फोटोसेशनही झाले. यावेळी प्रा. कांबळे यांनीही विद्यार्थ्याचे स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आचरा जामडुल बेटाची वाट धरली.
जवळजवळ चार दशकांनंतर एकमेकांना भेटणारे अनेक विस्मृतीत गेलेले अनेक चेहरे नव्या ओळखीस सज्ज झाले. सुरुवातीला प्रत्येकाने आपापला परिचय करून दिला. विशेष म्हणजे बॅचमधील
अनेकजण आजी आजोबाही झाल्याचे कळले.मग शाळेतील जुन्या आठवणी ,घडलेल्या गमतीजमती याचा जणू ‘तासच सुरु झाला. जो संपता संपेना. पुढे गाणी, गप्पांसह आठवणींच्या हिंदोळयावर सारेच स्वार झाले. विशेष म्हणजे पन्नाशी उलटलेली ही मंडळी पुन्हा एकदा विद्यार्थी बनून गेली. आणि सारेजण वयाचे भान विसरले.
एसएम हायस्कुलची ही १९८३-८४ सालची बॅच गुणवंत विद्यार्थ्यांनी भरलेली होती. काही विद्यार्थी तेव्हाच्या मेरिटमध्येही आले होते.
बॅचमधील कित्येकजण सरकारी क्षेत्रासह डॉक्टर व व्यवसायिक क्षेत्रातही यशस्वी जीवन जगत आहेत. एकीकडे दहावीनंतर पुढील शिक्षण, नंतर व्यवसाय, संसार यामुळे एकमेकांपासून दुरावलेले हे विद्यार्थी एकत्र आले तेव्हा किती बोलू न किती नको, असे सर्वांना झाले होते. या गेट टूगेदरसाठी शहरात वास्तव्यास असलेल्यांनी पुढाकार घेत नव्याने शखळजचा अविस्मरणीय अनुभव सर्वांनी घेतला.
‘गेट टूगेदरच्या आयोजनासाठी डॉ. विनय शिरोडकर, संजय बेलवलकर, संदीप म्हाडगुत, किशोर पटेल, गुरू काळसेकर, रमेश जोगळे यांनी पुढाकार घेतला. ‘गेट टूगेदरमध्ये डॉ.दिगंबर करंबेळकर, डॉ. अभिजीत चिटणीस, डॉ. कस्तुरी पाटील, गजानन मुळे , उद्योजक संदीप वालावलकर, राजू सावंत, केतन दळवी, संजीव प्रभु,सुधांशु कुलकर्णी, प्रमोद मालंडकर, शेखर ढेपसे, ए. टी. राणे, प्रसाद अंधारी, संजय धुमाळे, प्रसाद कुशे, महेश अंधारी, अमिता आंब्रडकर, नूतन मांजरेकर – केरकर, दिलीप पांडव, संगिता तावडे, रियाज शेख, तनोज कळसुलकर, किशोर लाड, संतोष घोणे, अनिल सावंत आदी सहभागी झाले होते.
